गुंतवणूकदारांना कोटींचा गंडा
By admin | Published: May 1, 2017 03:10 AM2017-05-01T03:10:49+5:302017-05-01T03:10:49+5:30
गुंतवणूकदारांची १ कोटी १ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून आर सोल्युशन्स या कंपनीच्या संचालकासह २ जणांवर
पुणे : गुंतवणूकदारांची १ कोटी १ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून आर सोल्युशन्स या कंपनीच्या संचालकासह २ जणांवर कोथरूड पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
गीता बारटक्के (वय ५३, पौड रोड, कोथरूड) यांनी फिर्याद केली असून रवींद्र गायकवाडसह दोन जण (यशश्री कॉलनी, कोथरूड) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मे २०११ ते डिसेंबर २०१६ दरम्यान हा प्रकार झाला.
आरोपींनी बारटक्के यांना कंपनीत गुंतवणूक केल्यास १६ टक्के वार्षिक व्याज देण्याचे आमिष दाखविले. रोख व चेक स्वरूपात ४० लाख रुपये घेतले. त्यांचे पती अभय यांच्याकडूनही १० लाख, सुप्रिया पारवे यांच्याकडून १३ लाख, नूतन कडवे यांच्याकडून १२ लाख तसेच हर्ष आणि प्रतिमा श्रीवास्तव यांच्याकडून २६ लाख रुपये घेतले.
या गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी हमीपत्रे तसेच पुढच्या तारखेचे चेक दिले. मात्र मुदत संपल्यानंतर बारटक्के व इतरांना व्याज दिले नाही. गायकवाड याने दिलेले चेक बाऊन्स झाले. तो पसार झाला असून सर्वांची १ कोटी १ लाख रुपयांची फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे तपास करत आहेत. (प्रतिनिधी)