मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून माजी खासदार आढळराव पाटलांना आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 12:58 PM2022-09-15T12:58:53+5:302022-09-15T12:59:00+5:30
आढळराव यांच्यासोबतच प्रधान सचिवांसह सर्व खात्यांचे अपर मुख्य सचिव यांनाही बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सूचना पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आले
शिक्रापूर : शिरूर लोकसभा मतदार संघातील कामांचा राजकीय संघर्ष सुरू असतांना विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी येथील कामासाठी खास प्रधान सचिवांसह सर्व खात्यांचे अपर मुख्य सचिव यांचेसमवेत स्वतंत्र बैठक गुरुवारी मुंबईत बोलावली आहे. विशेष म्हणजे बैठकीला शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना बोलवण्यात आले आहे.
महाआघाडी सरकार पायउतार होताना मंजूर केलेल्या कामांना थेट रद्द करण्याचा शिंदे-फडणवीस सराकरने एककलमी कार्यक्रम राबविला होता. यात सर्वात संवेदनशील विषय विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला होता. तो वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ हे जागतिक दर्जाचे बणविण्यासाठी महाआघाडी सरकारने २६९ कोटी २४ लाख रुपयांची मंजुरी दिली होती. तेच काम शिंदे-फडणविसांनी रद्द केले. यावर तात्काळ सरकारच्या वतीने शिंदे आणि फडणवीसांनी खुलासा करीत, आपले सरकार हिंदूहिताचे असल्याचे सांगितले. छत्रपती संभाजी महाराज समाधीचे हे प्रस्तावित काम रद्द न करता त्याचा सुधारीत आराखडा आम्ही करीत आहोत, असे त्यांनी जाहीर केले. यावर शिरुर-हवेलीचे मतदारसंघाचे आमदार अशोक पवार यांनीही थेट आंदोलनाचा इशारा सरकारला दिला होता. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी यासंबंधी आपला स्वतंत्र पाठपूरावा थेट मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुरू केला असल्याचे सांगितले. याचबरोबर इतर कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक आयोजित केली असून, त्यासाठी प्रधान सचिवांसह सर्व खात्यांचे अपर मुख्य सचिव यांनाही बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सूचना पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे.