स्वातंत्र्याचा एल्गार की स्वैराचाराला निमंत्रण?
By admin | Published: April 4, 2015 11:12 PM2015-04-04T23:12:51+5:302015-04-04T23:12:51+5:30
माझी आवड, माझी निवड, माझं प्रेम आणि माझी वासना या साऱ्यावरचा अधिकार फक्त माझा आणि माझाच...'' असं बेधडकपणे सांगणारा 'माय चॉईस' हा दीपिका पदुकोणचा व्हिडिओ सोशलमीडियावर भलताच गाजतोय.
''माझे शरीर, माझे मन, माझी आवड, माझी निवड, माझं प्रेम आणि माझी वासना या साऱ्यावरचा अधिकार फक्त माझा आणि माझाच...'' असं बेधडकपणे सांगणारा 'माय चॉईस' हा दीपिका पदुकोणचा व्हिडिओ सोशलमीडियावर भलताच गाजतोय. त्यात व्यक्त झालेली मते म्हणजे आजवर दबल्या गेलेल्या आधुनिक स्त्रीचा हा मुक्त स्वातंत्र्याचा एल्गार म्हणावा की नव्या स्वैराचाराला निमंत्रण म्हणावे, याविषयी समाजाच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे आणि तरुणाईचे विचारमंथन.....
बंधने झुगारण्याचा प्रयत्न
‘माय चॉईस’ या लघुपटामध्ये दीपिका पदुकोण या अभिनेत्रीने आधुनिक जगातल्या स्त्रीवर समाजाच्या पुरुषसत्ताक मानसिकतेतून जी बंधने लादली जातात, त्यांना झुगारून देण्याचा प्रयत्न केला आहे.
- स्वप्नील नवले
प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य
प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. आपल्या इच्छेप्रमाणे वर्तन-व्यवहार करण्याचा तिला अधिकार आहे. प्रत्येकाने सामाजिक स्वास्थ्याला बाधा येणार नाही, असे वर्तन करावे. - एकता रसाळ
स्वातंत्र्य अबाधित राहावे
स्त्रीने कोणते कपडे घालावेत, तिने कसे राहावे, दिसावे, विवाहपूर्व, विवाहबाह्य संबंध कसे प्रस्थापित करावे किंवा नाही, त्याचबरोबर तिने पुरुषावर प्रेम करावे की करू नये, या सर्व निर्णयाचे स्त्रीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. - अविनाश सागरे
स्वातंत्र्याचा गवगवा नको
निर्णय स्वातंत्र्याचा गवगवा करून दीपिकाने स्त्रियांच्या अंगप्रदर्शनाचे समर्थ करू नये. अभिनेत्रीच्या दिसण्या, बोलण्याचा युवक-युवतींवर थेट परिणाम होतो हे तिने विसरू नये. - सचिन कांबळे
जग बदलले आहे
होय, दीपिकाचे मत बरोबर आहे. जग बदलले आहे. आधुनिक झाले असे आपण म्हणतो; परंतु स्त्रीला अजूनही समाज एक उपभोग्य वस्तूच मानतो. तिच्यावर मालकी हक्क सांगून तिच्यावर बंधने लादतो.
- रामदास गरदरे
समानता गरजेची
समाजाने स्त्रियांच्या निर्णयाचा आदर करावा. आजचा काळ स्त्री-पुरुष समानतेचा आहे. एकाने दुसऱ्यावर अधिकार गाजवू नये.
- ओंकार लांडे
स्वातंत्र्य शैक्षणिक, आर्थिक, वैचारिक असायला हवे
स्वातंत्र्य ही संकल्पना सकारात्मक आहे. दीपिका जी संकल्पना मांडू पाहत आहे, ती नकारात्मक आहे. असल्या अतिरेकी स्वातंत्र्यामुळे समाज बिघडेल. महिलांनी भडक कपडे घालू नयेत, त्यातून वाईट गोष्टींना सामोरे जाण्याचीही वेळ येते. आर्थिक, शैक्षणिक, वैचारिक स्वातंत्र्य स्त्रीला मिळाले पाहिजे. आवडीच्या क्षेत्रात काम करता आले पाहिजे, आवडी आणि छंद जोपासता आले पाहिजेत. घरात आणि समाजात निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतले पाहिजे. हे ठीक आहे, नको त्या बाबतीत कसले स्वातंत्र्य पाहिजे ? सध्या महिलांना सध्या पुरेसे स्वातंत्र्य आहे. आता तर त्यांना ५० टक्के आरक्षणही दिले आहे. अगदी पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही महिला झाल्या. असेच त्यांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण झाले म्हणजे पुरे .
- डॉ. नीता आल्हाट, महिला अध्यक्ष, खेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना
...तर संस्कृतीचाच ऱ्हास
समाजात पुरुषाइतकाच स्रीला निर्णय प्रक्रियेत भाग घेण्याचा व आपले विचार निर्भीडपणे मांडण्याचा समान हक्क आहे. पुरुष समाज घडवतो, तर स्री समाज राखते ती तिच्या संस्कृतीमुळे. स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार असेल तर संकृतीचा ऱ्हासच पाहावयास मिळेल. या व्हिडिओचा उद्देश स्री सक्षमीकरण असेल तर समाजातील दुर्लक्षित महिलांसाठी काम करण्याची गरज आहे. जेव्हा प्रत्येक स्री पुरुषाच्या बरोबरीने समाजातील प्रत्येक घडामोडीत समानतेने सहभागी होईल, तेव्हाच. सक्षमीकरण होऊ शकेल. त्यासाठी अशा अवाजवी मागण्यांची किंवा प्रदर्शनाची गरज आहे.
- अमृता घोणे, माजी नगराध्यक्षा, जेजुरी न.प.
स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ निघायला नको
प्रत्येकाला मनासारखे जगण्याचा हक्क व अधिकार आहे. त्यात महिला अपवाद नाहीत.
महिला सबलीकरणासाठी ते आवश्यक आहे; परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ‘महिला सबलीकरण’ हा
विषय महत्त्वाचा असताना, स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ
निघायला नको. त्यामुळे मुलींनी, महिलांनी विचार करावा.
- अॅड़ बाळासाहेब पोखरकर, माजी अध्यक्ष घोडेगाव, वकील संघ
स्वातंत्र्य म्हणजे
स्वैराचार नव्हे
भारताच्या राज्यघटनेने स्त्रीला समान हक्क बहाल केले आहेत. समाजाचीही काही तत्त्वे असतात. त्यामुळे स्त्रीला जपावी लागणारी सामाजिक बांधिलकी विसरून
चालणार नाही.
महिला सक्षम होणे आणि आर्थिक दृष्ट्या सबळ होणे आवश्यक आहे. स्वैर स्वातंत्र्य आपली कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करेल. जाहीरपणे अशा मतप्रदर्शनाची पद्धत चुकीची आहे. भावी पिढीला चुकीचा बोध जातो.
- अॅड. अर्चना किर्लोस्कर,
उपाध्यक्ष, खेड तालुका वकील बार असोसिअशन
अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची मते सामाजिक दृष्ट्या अयोग्य अशीच आहेत. त्यांनी व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत. मात्र, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. त्यातून चांगले काही घडण्याची अपेक्षा बाळगणे व्यर्थ आहे. तसेच, युवतींमध्ये चुकीचा संदेश जाण्याची भीती आहे.
- किशोरी सातव,
शिक्षिका श्री छत्रपती हायस्कूल, बारामती
प्रत्येकालाच स्वातंत्र्याची आवड असते. ते स्वातंत्र्य उपभोगण्याची इच्छाही असते; पण त्या स्वातंत्र्यात स्वैराचार नसावा. समजातील चालीरीती, परंपरा याचे पालन होणे आवश्यक आहे; अन्यथा समाजरचना मोडकळीस येण्याची भीती आहे. प्रत्येक स्वातंत्र्याला दिलेल्या मोकळीकतेचा आदर व्हावा, अशी समाजमनाची अपेक्षा असते.
- डॉ. अपर्णा घालमे-पवार
महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा
समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. स्त्री-पुरुष समानता केवळ नावापुरतीच आहे; परंतु प्रत्यक्षात मात्र महिलांकडे आजही समानतेने पाहिले जात नाही़ २१ व्या शतकाकडे व आधुनिकतेकडे वाटचाल करताना दीपिका पादुकोण यांच्या ‘माय चॉईस’ या व्हिडीओतील काही विचार स्वीकारताना भारतीय संस्कृतीदेखील जोपासली गेली पाहिजे़
- अॅड़ भाग्यश्री शिंदे, नारायणगाव
भारत हा संस्कृती प्रधान देश आहे, या देशात स्त्रियांना आदराचे स्थान आहे. ‘माय चॉईस’ या चित्रपटात दीपिका पदुकोणने मांडलेला मुक्त जगण्याचा विचार भारतीय संस्कृतीत काहीसा खटकणारा आहे. नवीन विचारप्रणाली म्हणून काही गोष्टी योग्य आहेत; परंतु त्यातील काही गोष्टी आक्षेपार्ह आहेत. मुक्तपणाच्या नावाखाली होणारा अतिरेक टाळणे गरजेचे आहे़
- डॉ़ सदानंद राऊत,
अध्यक्ष- इंडियन मेडिकल असोसिएशन, शिवनेरी