मुलुंड येथील नाट्यसंमेलनासाठी भाजप, शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांना निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:34 PM2018-06-05T13:34:51+5:302018-06-05T13:34:51+5:30
आगामी वर्षातील निवडणूका लक्षात घेऊन ही एखादी ‘राजकीय’ खेळी तर नाही ना? अशी कुजबुज सुरू झाली आहे.
पुणे : मुलुंड येथे रंगणा-या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांनी भाजप-शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. आगामी वर्षातील निवडणूका लक्षात घेऊन ही एखादी ‘राजकीय’ खेळी तर नाही ना? अशी कुजबुज सुरू झाली आहे. मुलुंड येथे दि. १३ ते १५ जून या कालावधीत नाट्य संमेलन होत आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी स्वागताध्यक्ष या नात्याने या संमेलनाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. मे महिन्यात झालेल्या मध्यवर्ती नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये स्वत: तावडे जातीने हजर होते. परिषदेकडे आलेले प्रस्ताव त्यांनी पाहिले आणि ते नुसते मांडण्यापेक्षा त्यात करण्यात आलेल्या मागण्यांची पूर्तता करूनच ते मांडण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला, त्याला नियामक मंडळाने अनुमोदन दिल्याचे एका सदस्याने सांगितले. त्यामुळे हे संमेलन पूर्णत: शासन नियंत्रित राहणार यात कुणाचेच दुमत राहिलेले नाही. यातच आता तावडे यांनी संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांना निमंत्रित केल्याने संमेलनाला राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे. सध्या भाजप आणि सेनेमधून विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे. राज ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल सुरू आहे, त्यामुळे निवडणुकांपूर्वीच वातावरण चांगले तापत चालले आहे. या त्रिमूर्तींना संमेलनाच्या व्यासपीठावर बोलावून नक्की कोणता राजकीय हेतू साध्य करायचा आहे? अशी एक दबकी चर्चाही ऐकायला मिळत आहे. दरम्यान, विनोद तावडे यांनी बडोदा येथे झालेल्या साहित्य संमेलनात भिलार येथे आगामी साहित्य संमेलन शासनातर्फे आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नाट्य संमेलनावरही त्यांनी पकड ठेवली आह.यातून साहित्य आणि नाट्य संमेलनावर शासकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याचा एक प्रयत्न केला जातोय की काय? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.