कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी मागवले प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:08 AM2021-06-26T04:08:32+5:302021-06-26T04:08:32+5:30
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण जिल्हा कचरामुक्त करण्याची मोहीम जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर खेडच्या ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १५ ऑगस्टपर्यंत संपूर्ण जिल्हा कचरामुक्त करण्याची मोहीम जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर खेडच्या पिंपरी-पाईट गटातील गावांचा स्वच्छतेबाबतचा आढावा घेण्यासाठी वराळे येथे गटातील सरपंच व ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, जि.प.चे कक्ष अधिकारी विक्रम शिंदे, पंचायत विस्तार अधिकारी एस.डी.थोरात,अशोक तट, जगदीश घाडगे,सुजाता रहाणे आदींसह सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना टोणपे म्हणाले, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला खर्चाची मर्यादा नसून मुद्रांक शुल्क, १५ वा वित्त आयोग, ग्रामपंचायत निधी किंवा इतर फंडातील पैसे खर्च करू शकता. गावाच्या रस्त्यावर कचरा दिसता कामा नये, यासाठी रस्त्याच्या कडेच्या ग्रामपंचायतींनी दक्षता घेऊन उपाययोजना करावी.
ज्या गावांना गायरान जागा नाही त्यांनी गावठाणच्या मोकळ्या जागेचा प्रस्ताव करा. गावठाण जागेचे अधिकार जिल्हा परिषदेचे सीईओ यांना असल्याने लगेच जागा देण्यात येईल.येत्या १५ ऑगस्टला कचरामुक्त जिल्हा म्हणून घोषित होणार असल्याने ग्रामपंचायतींनी युद्धपातळीवर कचऱ्याचे व्यवस्थापन प्रकल्प करावा. तसेच एमआयडीसीमधील कंपन्या किंवा छोटे वर्कशॉपवाल्यांनी कचरा रस्त्याच्या कडेला टाकल्यास त्यांच्यावर ग्रामपंचायत स्तरावर दंडात्मक कारवाई करावी, अन्यथा गुन्हा दाखल करावा, अशा सूचना टोणपे यांनी बैठकीत केल्या आहेत.
या वेळी बोलताना शरद बुट्टे पाटील म्हणाले, एमआयडीसी टप्पा क्रमांक पाचव्या टप्प्यातील ग्रामपंचायतींनी कचरा प्रकल्पासाठी गायरान जागेचे प्रस्ताव दाखल करावेत. भविष्यात कंपन्यांमुळे गावची लोकसंख्या वाढणार आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उत्तम प्रकारे करावे. मोठ्या गावांना स्वच्छतागृहासाठी निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वराळेचे सरपंच दिनेश लांडगे यांनी टोणपे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. आभार ग्रामसेवक काकासाहेब मिंड यांनी मानले.
ग्रामसेवक यांना मार्गदर्शन करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे.