'दोनशे कोटी रुपयांच्या आरोपाचे व्हायरल पत्र केवळ बदनामीसाठी'; कृष्ण प्रकाश यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 08:44 PM2022-05-06T20:44:25+5:302022-05-06T21:16:29+5:30
सोशल मीडियावर आज दिवसभर व्हायरल होत असणारे पत्र खोटे- कृष्ण प्रकाश
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाचा गैरवापर करून माझ्या पोलीस आयुक्त पदाच्या कारकिर्दीत आपल्याकडून चुकीची कामे करून घेतल्या बाबतचा तक्रारी अर्ज सोशल मीडियावर आज दिवसभर व्हायरल होत आहे. सदर पत्र खोटे असल्याची माहिती कृष्ण प्रकाश यांनी सांगितले आहे.
आज दिवसभर सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झाले होते. ज्यामध्ये पिंपरी-चिंचवडचे माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गैरप्रकार केल्याचा आरोप होता. यावर कृष्ण प्रकाश म्हणाले, सदर पत्र हे पूर्णतः खोटे असून या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनीच लेखी तक्रार अर्ज पोलीस आयुक्तांकडे दिला असल्याने सदर लेटर हे केवळ आणि केवळ माझी बदनामी करण्यासाठी लिहिण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारची बदनामी करण्याचे प्रयत्न यापुर्वी देखील वारंवार केले गेले होते व ते असफल ठरलेले आहेत, असंही कृष्ण प्रकाश म्हणाले.
पुढे बोलताना कृष्ण प्रकाश म्हणाले, पिंपरी चिंचवड आयुक्त म्हणून काम करत असताना नागरिकांचे सर्वाधिक प्रेम , आपुलकी व आशीर्वाद मिळाले असल्यामुळे अशा प्रकारचे विघ्नसंतोषी लोकांचे आरोपांना फारशी किंमत न देता त्यावर कायदेशीर कारवाई करण्यावरच मी भर देणार आहे, तसेच जे कोणी माझी अशा प्रकारची बदनामी करू इच्छितात त्यांनी ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे की “ मी माझ्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीमुळे नागरिकांच्या मनात चांगले स्थान निर्माण करू शकलो व पोलीस दलाची प्रतिमा कायम उज्वल करू शकलो त्याला धक्का लावणे माझे कायदेशीर व अनुशासनात्मक कारवाईमुळे दुखावलेल्यांना कदापि शक्य नाही, अशी प्रतिक्रिया कृष्ण प्रकाश यांनी दिली.