आसाम आणि मिझोराम सीमावादातून झालेल्या गोळीबारात बारामतीचे भूमिपुत्र व आयपीएस अधिकारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 08:31 PM2021-07-27T20:31:14+5:302021-07-27T21:01:23+5:30
आयपीएस वैभव निंबाळकर पायाला गोळी लागल्याने जखमी
बारामती: आसाम आणि मिझोराम राज्यांमध्ये सोमवारी(दि २६) रात्री झालेल्या सीमावादातुन गोळीबार झाला.यावेळी झालेल्या गोळीबारात सणसर (ता.इंदापुर) चे भुमिपुत्र आयपीएस अधिकारी वैभव चंद्रकांत निंबाळकर पायाला गोळी लागल्याने जखमी झाले आहेत.
याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सणसरचे सरपंच रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह वैभव यांची बहीण अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली. आसाम आणि मिझोराम राज्यातील असलेल्या सीमावादातुन ही घटना घडली. यावेळी झालेल्या गोळीबारात पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
तर आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर हे पायाला गोळी लागुन जखमी झाले आहेत.निंबाळकर हे सणसर(ता. इंदापुर)चे भुमिपुत्र आहेत.ते सध्या आसाम राज्यातील कछार जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पदावर कार्यरत आहेत.मिझोराम आसाम सीमेवर झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले.त्यांच्यावर उपचार सुरु असुन त्यांच्या तब्येतीला लवकर आराम पडो,ही सदिच्छा,लवकर बरे व्हा.. अशा शब्दात खासदार सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली.
तर सरपंच निंबाळकर यांनी देखील आसाम आणि मिझोराम राज्यात झालेला हिंसाचार दुर्दैवी आहे.या हिंसाचारात पाच पोलीसांचा मृत्यु झाला आहे.तसेच सणसरचे सूपुत्र वैभव निंबाळकर जखमी झाले आहेत.या काळात निंबाळकर यांनी दाखविलेले धैर्य अतुलनीय असल्याचे सोशल मिडीयावर पोस्ट करीत नमुद केले.