अकरावी प्रवेशासाठी बुद्धिमापन चाचणी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:10 AM2021-05-13T04:10:41+5:302021-05-13T04:10:41+5:30
पुणे : अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याबाबत केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात ६५ टक्क्यांहून अधिक जणांनी सीईटी घेण्यास होकार दर्शविला आहे. त्यातच ...
पुणे : अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याबाबत केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात ६५ टक्क्यांहून अधिक जणांनी सीईटी घेण्यास होकार दर्शविला आहे. त्यातच या ‘सीईटी’ परीक्षेत बुद्धिमापन चाचणी, विज्ञान, गणित आणि व्याकरण या घटकावरील प्रश्नपत्रिका काढण्याचा राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे विचार केला जात आहे. त्यामुळे प्रथमच दहावीतील विद्यार्थ्यांना ‘बुद्धिमापन चाचणी’ या घटकावरील प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे.
राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घ्यावी का? याबाबत ११ मेपर्यंत ऑनलाइन अभिप्राय मागविले. त्यात ६५ टक्के विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी सकारात्मकता दर्शविली आहे. परंतु, अद्याप राज्य शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेणार किंवा नाही याबाबतचा निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र, शिक्षण विभागातर्फे सर्व बाजूंनी तयारी केली जात आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राज्य शासन आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ पदाधिकारी एकत्रित बैठक घेऊन प्राप्त झालेल्या सर्वेक्षणाच्या आधारे सीईटी परीक्षा घ्यावी किंवा घेऊ नये, याबाबत निर्णय घेणार आहेत. तसेच सीईटी घेण्याचे निश्चित झाल्यास सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांना याबाबत कल्पना दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे सीईटी परीक्षेसाठी विशिष्ट अभ्यासक्रम निश्चित करून त्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविली जाईल.
दहावीच्या सर्व विषयांवर १०० किंवा २०० गुणांची सीईटी परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे विज्ञान, गणित, व्याकरण आणि बुद्धिमापन चाचणी या घटकांवरील बहुपर्यायी प्रश्न ‘सीईटी’साठी विद्यार्थ्यांना देण्याबाबत विचार केला जात आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती निवळल्यानंतर ही सीईटी घेतली जाणार जाणार आहे. त्यामुळे परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळेल, असेही शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.