‘आयआरसीटीसी’ देणार खासगी कंपन्यांना टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 12:20 PM2019-10-09T12:20:10+5:302019-10-09T12:21:27+5:30

ठराविक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी यापूर्वी स्वतंत्र पर्यटन पॅकेज नव्हती...

IRCTC will given to fight private companies | ‘आयआरसीटीसी’ देणार खासगी कंपन्यांना टक्कर

‘आयआरसीटीसी’ देणार खासगी कंपन्यांना टक्कर

Next

पुणे : देशात पर्यटनाला जाण्यासाठी बहुतेक जण खासगी पर्यटन कंपन्यांना प्राधान्य देतात. प्रवास तिकिटापासून राहणे-खाणे, फिरण्याची विविध पॅकेज या कंपन्यांकडून दिली जातात. पण हा खर्च अनेकांच्या आवाक्याबाहेरचा असतो. तसेच काही ठराविक ठिकाणांपुरतीच ही पॅकेज असतात. हेच ओळखून इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहे. देशभरातील विविध ठिकाणांसाठीची पर्यटन पॅकेज तयार करण्यात आली असून त्यामध्ये धार्मिक स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे. 
‘आयआरसीटीसी’कडून भारत दर्शन, महाराजा अशा विविध विशेष पर्यटन रेल्वेगाड्या चालविल्या जातात. तसेच काही ठराविक ठिकाणांसाठीही विशेष गाड्या आहेत. संपूर्ण भारतभ्रमण करण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांना या गाड्यांचा फायदा होतो. पण ठराविक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी यापूर्वी स्वतंत्र पर्यटन पॅकेज नव्हती. तसेच या गाड्यांचा कालावधीही मोठा असतो. ‘आयआरसीटीसी’ने नुकतीच ही पॅकेज आणून सर्वसामान्यांना पर्यटनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या पॅकेजच्या  माध्यमातून रेल्वेचा ये-जा करण्याचा तिकीट खर्च, हॉटेल किंवा रेल्वेच्या गेस्ट हाऊसमध्ये राहणे, खाण्याची व्यवस्था, संबंधित ठिकाणी वाहन व्यवस्था अशा सुविधा या पॅकेजमध्येच मिळणार आहेत. याविषयी अधिक माहिती देताना ‘आयआरसीटीसी’चे पुण्याचे विभागप्रमुख गुरुराज सोना म्हणाले, की अनेक पर्यटकांना ठराविक ठिकाणांना भेट द्यायची असते. यासाठी स्वतंत्र पॅकेज नसतात. त्यामुळे पर्यटकांसाठी पहिल्यांदाच अशी पॅकेज सुरू करण्यात आली आहेत. 
.....
एसी डब्यांमधील प्रत्येक ८ आसने आरक्षित

पुणे, मुंबईसह विविध स्थानकांतून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधून संबंधित ठिकाणी जाता येईल. नियमित धावणाऱ्या या गाड्यांमधील ३ एसी आणि शयनयान एसी डब्यांमधील प्रत्येक ८ आसने आरक्षित असतील. पूर्वेकडील राज्य वगळता देशभरातील बहुतेक सर्व पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश आहे. 

सध्या पुणे व मुंबईतून हैदराबाद, केरळ, वैष्णोदेवी, शिर्डी, बालाजी, गोवा, तिरुपती, रामोजी फिल्मसिटी, जगन्नाथ धाम, म्हैसूर, उटी, हंपी, जबलपूर, कुर्ग, बेंगलुरू, मध्य प्रदेश, गुजरात, ग्वाल्हेर अशा विविध ठिकाणांसाठी पर्यटन पॅकेज उपलब्ध आहे. अत्यंत परवडणारी पॅकेज पर्यटकांना आकर्षित करतील. संकेतस्थळ तसेच अ‍ॅपवरूनही आरक्षण करता येणार आहे.  

Web Title: IRCTC will given to fight private companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.