चासकमान धरणाच्या कालव्यावरील लोखंडी पूल मोडकळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:10 AM2021-04-05T04:10:23+5:302021-04-05T04:10:23+5:30
तालुक्यात चासकमान धरण्याच्या डाव्या उजव्या कालव्यांवर धरणाचे कालवे झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या गैरसोय होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाच्या वतीने अनेक गावांमध्ये ...
तालुक्यात चासकमान धरण्याच्या डाव्या उजव्या कालव्यांवर धरणाचे कालवे झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या गैरसोय होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाच्या वतीने अनेक गावांमध्ये विविध ठिकाणी लोखंडी कालव्यावरती पूल तयार केले. पुलांना तीस वर्षे झाली आहेत.त्यामुळे ते गेल्या दहा वर्षांपासून गंजले असून त्यावरील पत्रे लोखंडी अँगल नादुरुस्त बनले आहेत. त्यावरून शेतकऱ्यांना जा-ये धोक्याचे करणे बनले आहे. याबरोबरच शेतकरीवर्गाला मालवाहतूक करताना जीव धोक्यात घालून शेतीमाल वाहतूक करावी लागत आहे. तालुक्यातील चासकमान धरणाच्या डाव्या उजव्या कालव्यांवर चास, कमान, रेटवडी, निमगाव, दावडी, दौंडरवाडी, चिंचोशी, बहुळ, पांगरी, सातकरस्थळ, सांडभोरवाडी, टाकळकरवाडी, पाडळी ढोरेभांबुरवाडी या गावातील सर्व लोखंडी पूल मोडकळीस आले असून त्यांची दुरुस्ती करावी, अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यातील कालव्यांवरील सर्व लोखंडी पूल पाटबंधारे विभागाने तत्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी दावडी गावचे सरपंच आबा घारे, समर्थ फाऊंडेशन अध्यक्ष विजयसिंह शिंदे पाटील यांच्यासह ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.
ओळ:
चासकमानच्या डाव्या कालव्यावरील लोखंडी पुलाची झालेली दुरवस्था.