Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या 'आयर्नमॅन’ युवा खेळाडुची चाचणी ‘निगेटीव्ह’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 04:51 PM2021-11-30T16:51:00+5:302021-11-30T16:51:22+5:30
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या आणि जगभरात सध्या चिंतेचा विषय असलेल्या ओमीक्रॉन व्हेरिएन्ट विषाणूची धास्ती सर्वांनीच घेतली
बारामती: दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या आणि जगभरात सध्या चिंतेचा विषय असलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएन्ट विषाणूची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. या पार्श्वभुमीवर दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे २१ नोव्हेंबर ला पार पडलेल्या जागतिक पातळीवरील स्पर्धेत यश मिळविलेल्या बारामतीकर युवा खेळाडुसह त्याच्या वडीलांची कोरोना चाचणी ‘निगेटीव्ह’ आली आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएन्ट विषाणू चा संसर्ग धोकादायक असून वेगाने फैलावण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. विशेषत: त्या देशातून महाराष्ट्रात परतलेले काहीजण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे बारामतीकर युवा खेळाडु आणि त्याच्या ‘स्पोर्टस मॅन’ वडीलांची कोरोना चाचणी नुकतीच करण्यात आली होती. ती निगेटीव्ह आली आहे. दोघे खेळाडु बापलेक नुकतेच काही दिवसांपुर्वी दक्षिण आफ्रिकेतून परतले आहेत. सहा दिवसांपूर्वी भारतात परतलेल्या बारामतीच्या खेळाडूची आणि त्याच्या वडिलांची कोरोना तपासणी बारामतीच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली. दोघांचा देखील रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभाग आणि बारामतीकरांनी सुटकेचा निश्वा:स सोडला आहे.
या खेळाडूसह त्याच्या वडीलांचे बारामतीत आल्यानंतर जंगी स्वागत करण्यात आले होते. ग्रामीण भागातून लहान वयात या जागतिक स्पर्धेपर्यंत पोहचलेला तो प्रथम खेळाडु आहे. त्यामुळे त्याच्या कोरोना तपासणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मंगळवारी(दि ३०) त्या दोघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांनी मोठे संकट टळल्याचा आनंद व्यक्त होत आहे. मात्र, रीपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर देखील आरोग्य विभागाकडून त्यांना सात दिवस विलगीकरणात राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती तालुका अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.