पेट परीक्षेतून दोन विद्यार्थ्यांना नियमबाह्य सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:15 AM2021-08-19T04:15:58+5:302021-08-19T04:15:58+5:30
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दोन विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या पेट परीक्षेतून दोन विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने सूट दिली ...
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दोन विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या पेट परीक्षेतून दोन विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने सूट दिली असल्याचा आरोप विद्यापीठाचे अधिसभा सदस्य विवेक बुजडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच, या दोन विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यापीठाचे अधिकारी असून, दुसरा एका नामवंत महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक आहे. त्यामुळेच विद्यापीठ प्रशासन याबाबत चौकशी करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचेही बुचडे यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये पेट परीक्षेतील गैरप्रकारांबाबतचा मुद्दा बुचडे यांनी अनेकवेळा उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, पेट परीक्षेतून सूट मिळालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठ प्रशासनाशी चांगले संबंध असल्याने, त्याची चौकशी केली जात नसल्याचा आरोप बुचडे यांनी केला.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २०१४ मधील नियमावलीनुसार पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या सरकारी किंवा खासगी क्षेत्रातील वरिष्ठ पदावर सलग दहा वर्षे काम करण्याचा अनुभव असणाऱ्यांना पेट परीक्षेतून सूट देण्यात आली होती. त्यानुसार पुणे विद्यापीठाच्या २०१५-१६ या शैक्षणिक वर्षामध्ये झालेल्या पेट परीक्षा देण्यापासून अनेक विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली होती. पेट परीक्षेतून सवलत मिळालेल्या एकूण ८० विद्यार्थ्यांनी पीएच.डी.साठी प्रवेश घेतला. मात्र, त्यातील २२ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे समोर आले. परंतु, २० विद्यार्थ्यांनी त्रुटींची पूर्तता केली. मात्र, दोन विद्यार्थ्यांना पेट परीक्षा देण्यापासून नियमबाह्य पद्धतीने सूट दिल्याचे समोर आले.
दोषींकडे दुर्लक्ष
पेट परीक्षेतून सूट मिळालेल्या दोन विद्यार्थ्यांचे संशोधन केंद्र आणि मार्गदर्शकही एकच आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, याबबात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोपही बुचडे यांनी केला.
---------------