Omicron Variant: पुणे महापालिकेचा बेजबाबदारपणा; रेल्वे, बस स्थानकांवर तपासणी यंत्रणा कुठंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 01:33 PM2021-12-13T13:33:15+5:302021-12-13T13:33:37+5:30
ओमायक्रॉनचा धोका ओळखून राज्य सरकारने विविध ठिकाणी नवे निर्बंध लावले आहेत. यात किराणा दुकानात येणाऱ्या ग्राहकाने जर मास्क लावला नाही, तर संबंधित दुकानदाराला दंड करण्याचा नियम आहे
पुणे : ओमायक्रॉनचा धोका ओळखून राज्य सरकारने विविध ठिकाणी नवे निर्बंध लावले आहेत. यात किराणा दुकानात येणाऱ्या ग्राहकाने जर मास्क लावला नाही, तर संबंधित दुकानदाराला दंड करण्याचा नियम आहे. हा नियम रेल्वे व बस प्रवासाला देखील लागू आहे. मात्र, पुणे रेल्वेस्थानक असो की, स्वारगेट बसस्थानक येथे मात्र प्रवाशांची तपासणी करणारी यंत्रणा नाही. रोज हजारो प्रवासी पुण्यात येतात आणि जातात. मात्र, त्यांना विचारणारी अथवा तपासणारी यंत्रणाच नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाची ही जबाबदारी आहे.
मात्र, ही यंत्रणा या दोन्ही ठिकाणी नसल्याने लस न घेतलेले प्रवासी देखील सुसाट पणे प्रवास करीत आहे. आरोग्य यंत्रणेने देखील तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका यंत्रणेने तत्काळ खबरदारीचे पावले उचलणे गरजेचे आहे. मात्र, अद्याप पुणे रेल्वेस्थानकांवर तसेच स्वारगेट व शिवाजीनगर स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना काहीच विचारले जात नाही.
कुठेच विचारणा नाही
पुणे स्थानकांवर रोज जवळपास १ लाख प्रवासी येतात. दुसऱ्या लाटेच्या वेळी स्थानकाच्या नव्या व मोठ्या पादचारी पुलावर विभागाचे कर्मचारी प्रवाशांची तपासणी करीत होते. तसेच त्यांच्याकडे आरटी- पीसीआर रिपोर्टची देखील मागणी केली जात होती. मात्र, तशी व्यवस्था आता नाही.
रेल्वेकडून केवळ मास्कची कारवाई
रेल्वेस्थानकावर अथवा रेल्वेत प्रवासी जर मास्क लावला नसेल, तर त्यांच्यावर टीसीकडून कारवाई केली जात आहे. अशा प्रवाशांवर केवळ दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्क न घातलेल्या प्रवाशाला किमान ५०० रुपयांचा दंड आकाराला जातो. मात्र, प्रवाशांच्या तापमान वा अन्य बाबी तपासण्याचे अधिकार महापालिका प्रशासनाला आहे.
''रेल्वेच्या अखत्यारीत येणारे सर्व तो परी मदत केली जात आहे. तिकीट काढण्याच्या वेळापासून ते प्रवास सुरू होईपर्यंत आवश्यक त्या सर्व ठिकाणी आम्ही जागृती करतो. तपासणी करण्याचे काम महापालिका यंत्रणेचे आहे असे पुणे रेल्वे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले आहे.''