महिला-मध्यमवर्गीयांचे प्रश्न मांडायचेच नाहीत का? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 04:22 PM2023-12-19T16:22:57+5:302023-12-19T16:26:17+5:30

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सुळे यांच्यासह ४९ खासदारांच निलंबन करण्यात आले आहे...

Is it not necessary to raise the issues of women-middle class? MP Supriya Sule's question | महिला-मध्यमवर्गीयांचे प्रश्न मांडायचेच नाहीत का? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल

महिला-मध्यमवर्गीयांचे प्रश्न मांडायचेच नाहीत का? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल

बारामती (पुणे) : दुष्काळ आणि सरकारच्या धोरणांमुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, कांदा-कापूस-सोयाबीन-दूधाच्या दरांचा प्रश्न सरकारला विचारायचा नाही तर कुणाला विचारायचा? शेतकऱ्यांचं म्हणणं जर सरकारपर्यंत मांडायचंच नसेल, बेरोजगारांची घुसमट सरकारला ऐकायचीच नसेल, महिला-मध्यमवर्गीयांचे प्रश्न या सरकारला ऐकायचेच नसतील तर ते मांडायचेच नाहीत का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सुळे यांच्यासह ४९ खासदारांच निलंबन करण्यात आले आहे.या पार्श्वभुमीवर सुळे यांनी सोशल मिडीयावर हा सवाल केला आहे. जर हे प्रश्न मांडले तर ते सभागृहातून बाहेर काढतात. संसदेच्या सुरक्षेत नेमकी काय चूक झाली. याबद्दल प्रश्न विचारणे भाजपाच्या राज्यामध्ये गुन्हा आहे का? हा प्रश्न विचारणाऱ्या १४१ खासदारांना माननीय लोकसभा अध्यक्षांनी निलंबित केले आहे. भाजपा सरकारने आज माझ्यासह आणखी ४९ खासदारांना संसदेतून निलंबित केले. सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहे हे स्पष्ट आहे. तसेच काही महत्वाच्या विधेयकांना चर्चेविनाच मंजूर करण्याचा भाजपाचा डाव असल्याचे सुळे यांनी नमुद केले आहे.

या दोन तीन दिवसांत वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच करणारे प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरीऑडिकल्स बिल २०२३, निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर कठोर प्रहार करणारे आणि निवडणूक आयोगाला केंद्र सरकारच्या हातचे बाहुले बनविणारे चीफ इलेक्शन कमिश्नर अँड अदर इलेक्शन कमिश्नर बिल २०२३,केंद्र सरकारला टेलिकॉम सर्विसेसमध्ये घुसखोरी करण्याचे आणि सुरक्षेच्या नावाखाली कुणाचेही फोन टॅप करण्याचे अधिकार देणारे टेलिकम्युनिकेशन बिल २०२३, पोलीसांना अमर्याद अधिकार देऊन नागरिकांच्या अधिकारांचा संकोच करणारी क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ही चार महत्वाची विधेयके चर्चेला येणार होती. परंतु सरकारमध्ये विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची हिंमत नाही. त्यांनी त्यांना सभागृहातूनच निलंबित करण्याचा सोपा मार्ग निवडला. म्हणजे ही अघोषित आणिबाणी आहे.

जनतेचा आवाज दडपाण्याचे पाप हे सरकार करतंय आणि म्हणूनच आम्ही सर्वजण या दडपशाहीच्या विरोधात ठामपणे एकजूटीने उभे असल्याचे सुळे यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरील पोस्टमध्ये नमुद केले आहे.

Web Title: Is it not necessary to raise the issues of women-middle class? MP Supriya Sule's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.