Pune Rain: पुणे महापालिका झोपली आहे का? सतर्कतेच्या सूचना देऊनही उपाययाेजना शून्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 09:17 AM2022-10-19T09:17:58+5:302022-10-19T09:18:16+5:30
शहरात सोमवारी झालेल्या पावसाच्या पाण्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप
पुणे : शहरात सोमवारी झालेल्या पावसाच्या पाण्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. चार तास आधी हवामान अंदाज देण्याचा फायदा काय, असा जळजळीत प्रश्न हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी महापालिकेला केला आहे. हवामान तज्ज्ञांनी इशारा देऊनही महापालिका प्रशासन झोपले होते काय, महापालिकाच पुणेकरांच्या जिवाशी खेळत आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कमी वेळेत जास्त पाऊस पडण्याच्या घडना घडत आहेत. त्याची माहिती किमान चार तास आधी पुरवली जात आहे. तरीदेखील महापालिका प्रशासन त्यावर कार्यवाही करत नाही, असा आराेप नागरिकांकडून हाेत आहे. हवामान विभागाकडून चार तास आधी पावसाचा अंदाज दिला जातो. ही माहिती महापालिका आयुक्तांपासून आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही उपलब्ध असते. त्यामुळे शहरात मोठा पाऊस पडेल याचा अंदाज या अधिकाऱ्यांना असतो. त्यानंतरही त्यावर कार्यवाही केली जात नाही, असा थेट आरोप डाॅ. काश्यपी यांनी केला.
कल्पना असूनही उपाय नाहीच
गेल्या काही दिवसांपासून शहरात सायंकाळीच जोरदार ते मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या शुक्रवारी झालेल्या पावसाने डेक्कन परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अनेक गाड्या अडकून पडल्या. त्यामुळे पुणेकरांचे प्रचंड हाल झाले. त्यानंतरही प्रशासनाकडून काहीही हालचाल झाली नाही. सोमवारी अशा प्रकारचा पाऊस पडेल याचा अंदाज वेळोवेळी देण्यात येत होता. पाऊस वाढतोय असेही सांगण्यात येत होते. त्यामुळे अशा पावसाची प्रशासनाला कल्पना होती. त्यावर काहीही उपाययोजना झाल्या नाहीत, असेही डाॅ. काश्यपी म्हणाले.
पर्जन्यमापक लावतो; पण जागा मिळत नाही
- शहरात केवळ सहा ठिकाणी हवामान विभागाचे पर्जन्यमापक आहेत. त्यातही लवळे व चिंचवड येथील दोन पर्जन्यमापक हे पिंपरी महापालिका हद्दीतील आहेत. सोमवारी झालेला पाऊस शिवाजीनगरपेक्षा कोंढवा येथे जास्त झाला. मात्र, येथील १७८.६ मिमी पावसाची नोंद रेन इन्थुझियास्ट या संस्थेकडून करण्यात आली.
- गेल्या काही दिवसांचा ट्रेंड बघता कात्रज कोंढवा भागात स्वतंत्र पर्जन्यमापकाची गरज आहे. शहराच्या इतर भागांतही त्याची गरज आहे. याबाबत अनेकदा चर्चा करूनही कार्यवाही होत नसल्याची खंत डाॅ. काश्यपी यांनी व्यक्त केली. आम्हाला योग्य व सुरक्षित जागा दिल्यास पाच लाखांचे पर्जन्यमापक लावण्यास तयार आहोत, असेही ते म्हणाले.
नियोजनच नाही :
पुणे शहर हे रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. येथील वातावरण अतिशय सुंदर आहे. महिलांसाठी सुरक्षित आहे. मात्र, पावसामुळे होणारी समस्या एक गंभीर स्वरूप धारण करत आहे. पावसाच्या पाण्याला वाहून जाण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे सोमवारसारखी स्थिती वारंवार निर्माण होत आहे. प्रशासनाच्या पातळीवर मोठा गोंधळ दिसून येत आहे. योग्य नियोजन त्यासाठी महत्त्वाचे आहे. बांधकामे करताना याचा विचार भविष्यासाठी करावा लागणार आहे, असेही डाॅ. काश्यपी म्हणाले.