ब्राह्मण समाज नाराज आहे का? हे २ तारखेला कळेलच; कुणाल टिळक यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 02:41 PM2023-02-09T14:41:12+5:302023-02-09T14:46:01+5:30
आमची कोणतीही नाराजी नाही आम्ही धुमधडाक्यात प्रचार करणार
पुणे : पुण्यात भाजपाकडून कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. कसब्यातून आज महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचाराचा शुभारंभ वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरजी मुनगंटीवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या प्रचार सभेत टिळक कुटुंबीय सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. त्यावेळी ब्राह्मण समाज नाराज आहे का? हे २ तारखेला कळेलच अशी प्रतिक्रिया कुणाल टिळक यांनी दिली आहे. कसब्याच्या उमेदवारीवरून ब्राह्मण समाज नाराज झाल्याच्या चर्चा सर्वत्र होऊ लागल्या होत्या. त्याबाबत कुणाल टिळक यांना विचारले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले.
कुणाल टिळक म्हणाले, ब्राह्मण समाज नाराज असल्याचे समाजमाध्यमांवर पसरू लागले आहे. परंतु दोन तारखेच्या मतमोजणीला भाजप भरघोस मतांनी विजयी होणार आहे. त्यावेळी हे चित्र स्पष्ट होईल. पोटनिवडणुकीची उमेदवारी न मिळाल्याने टिळक कुटुंबीय नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र या प्रचार सभेत टिळक कुटुंबीय सहभागी झाले आहेत. आमची कोणतीही नाराजी नाही आम्ही धुमधडाक्यात प्रचार करणार आहोत, अशी प्रतिक्रिया कुणाल टिळकांनी दिली आहे.
आज सकाळी ओंकारेश्वर मंदिरापासून रॅलीला सुरुवात झाली. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, शैलेंद्र चव्हाण, नाना भांनगिरे, माजी आमदार बापुसाहेब पठारे, योगेश टिळेकर, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, प्रभारी धीरज घाटे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कसब्यात अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी सुद्धा भाजपच भरघोस मतांनी निवडून येणार आहे. माझा कसब्यातील जनतेवर विश्वास आहे. ते मला नक्कीच विजय मिळवून देणार असल्याचे हेमंत रासने यांनी सांगितले आहे.