कोणाला थोबडवायला कायदा आहे की नाही? विद्या चव्हाण यांचा चित्रा वाघ यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 07:48 PM2023-01-03T19:48:33+5:302023-01-03T19:48:41+5:30
कोणी कसले कपडे घातले म्हणून समजा बिघडला, असे मला वाटत नाही
पुणे : कोणी कोणते कपडे घातले म्हणून समाज बिघडला, याला काही अर्थ नाही. मात्र म्हणून कोणी कोणाला समोर आली तर थोबडवीन म्हणत असेल तर राज्यात कायदा, सुव्यवस्था आहे की नाही याचा जाब विचारावा लागेल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार विद्या चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांना टोला लगावला.
अभिनेत्री उर्फी हिने घातलेल्या पेहरावावरून सध्या वादळ उठले आहे. वाघ यांनी ती समोर आली तर थोबडवीन असे वक्तव्य केले होते. त्याला चव्हाण यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महागाई विरोधी आंदोलनाची माहिती देण्यासाठी त्या पक्षाच्या शहर कार्यालयात आल्या होत्या. त्या म्हणाल्या, कोणी कसले कपडे घातले म्हणून समजा बिघडला, असे मला वाटत नाही. माझा त्यावर विश्वास नाही. मात्र असे कपडे घालणाऱ्याला कोणी थोबडवीन म्हणत असेल तर मात्र सरकारला कायदा व सुव्यवस्थेचा जाब विचारावा लागेल. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजियाखान, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, तसेच वैशाली नागवडे, युवती काँग्रेसच्या सक्षणा सलगर व अन्य महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.
विद्या चव्हाण म्हणाल्या, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून महागाई प्रचंड वाढली आहे. सत्तेवर येताना त्यांनी दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगारासारखी आकर्षक वचने दिली होती. सत्तेवर आल्यापासून मागील ८ वर्षांत त्यांना याचा विसर पडला आहे. सामान्यांना जगणे अवघड झाले आहे. याविरोधात महिला काँग्रेस राज्यात सर्वत्र जिल्हानिहाय चौक सभा, मोर्चा, समूहांच्या भेटीगाठी, चर्चा यातून जनजागृती करणार आहे.
महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी दुपारी आपटेरोडवरली सेंट्रल पार्कमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तिथून पुणे जिल्ह्यातील आंदोलनाला सुरुवात होईल. ते पुढे पाच महिने वेगवेगळ्या जिल्ह्यात चालणार आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.