आयएसएमटी कंपनीने टाळेबंदी उठविली
By admin | Published: March 6, 2017 01:31 AM2017-03-06T01:31:26+5:302017-03-06T01:31:26+5:30
उत्पादन वाढल्यास त्या प्रमाणात प्रोत्साहनपर वाढ देण्याचे बंधन घालून जेजुरीतील आय.एस.एम.टी.कंपनीने अखेर टाळेबंदी उठविली
जेजुरी : वेतनकराराचा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेऊन उत्पादन वाढल्यास त्या प्रमाणात प्रोत्साहनपर वाढ देण्याचे बंधन घालून जेजुरीतील आय.एस.एम.टी.कंपनीने अखेर टाळेबंदी उठविली. पंधरा दिवस बंद असलेली कंपनी अखेर शनिवारी सकाळी सुरू झाली. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गेटवर कामगारांना शुभेच्छा देत, यापुढील काळात कंपनीने व कामगारांनी समन्वय ठेऊन काम करावे, असे आवाहन केले.
जेजुरीतील आय.एस.एम.टी. कंपनी गेल्या पंधरा दिवसांपासून बंद होती. सुमारे दीड हजार कामगारांच्या रोजगारांचा प्रश्न
यामुळे निर्माण झाला होता. कंपनी सुरू व्हावी, यासाठी पुण्यात दोनवेळा कामगार आयुक्त व विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. अखेर काही अटी मान्य करून कंपनी शनिवारी सकाळी सुरू झाली.
कामगार आयुक्तांच्या समवेत झालेल्या बैठकीला कंपनीचे अध्यक्ष बी. आर. तनेजा, ओ. पी. कक्कर, किशोर भारंबे, अप्पर कामगार आयुक्त बी. आर. देशमुख, सह कामगारआयुक्त सुरेश कारकर, कामगार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ बरकडे,
सहसचिव शोभाचंद डोके, कार्याध्यक्ष मधुकर घाटे, उपाध्यक्ष किशोर बारभाई, माजी अध्यक्ष रोहित घाटे आदी उपस्थित होते.
शनिवारी सकाळी कंपनी गेटवर कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगार जमा झाले होते.
राज्यमंत्री विजय शिवतारे हेही तेथे आले. त्यांच्या समेवत पंचायत समिती सदस्य अतुल म्हस्के, रामभाऊ झगडे, रवि निंबाळकर, उद्योजक शिवाजी पवार, गिरीश पवार उपस्थित होते.
कंपनी चालू राहिली पाहिजे आणि त्यातून कामगारांचे हितही साधले पाहिजे, जेजुरी परिसरात मोठे उद्योगनजीकच्या काळात येत आहेत. आय.एस.एम.टी.बंद राहिल्याने चुकीचा संदेश उद्योजकांना जाईल. जेजुरी परिसरातील अर्थव्यवस्था
या कंपनीवर अवलंबून आहे. कामगार व कंपनीने एकमेकांचे हित पाहून कंपनी सुरळीत चालू ठेवावी. लागणारी सर्व मदत दिली जाईल, असे शिवतारे यावेळी कामगारांशी बोलताना म्हणाले.
कामगारांच्या वतीने उत्पादन वाढविण्याचे नियोजन केले जाईल, असे संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ बरकडे यांनी सांगितले.
या वेळी अतुल म्हस्के यांनी मनोगत व्यक्त केले. शोभाचंद डोके यांनी सूत्रसंचालन केले. मधुकर घाटे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
दोन्ही बाजूंनी दाखवली सहमती
या वेळी पगारवाढीचा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवून टाळेबंदी उठविण्यासाठी तात्पुरत्या पर्यायावर दोन्ही बाजूंनी सहमती दाखविण्यात आली. ती पुढीलप्रमाणे-एक मार्चपासून उत्पादन ध्येय हे ९००० ते ११५०० मे.टन यासाठी प्रोत्साहनपर पगारवाढ १५०० देण्यात येणार आहे.
त्यापुढील उत्पादनासाठी म्हणजे, ११५०० मे.टन ते १४००० मे.टन ४०० रुपये, १४००० मे.टन. ते १६५०० मे.टनासाठी ६०० रुपये व १६५०० मे.टन ते १८५०० मे.टनापर्यंत ३३०० असे प्रोत्साहनपर वाढ देण्यात येणार आहे.
१८५०० मे.टन उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य केल्यानंतर, प्रलंबित पगारवाढीविषयी व्यवस्थापन व कामगार यांच्यात चर्चा होऊन करार करण्याचे या वेळी ठरविण्यात आले.
टाळेबंदीच्या काळातील सर्व पगार कामगारांना देण्यात येणार आहे. या बदल्यात तीन साप्ताहिक सुट्यांचे काम करून कामगार बंद काळातील काम भरून काढण्यात येणार आहे.