'एसआरपीएफ'ला आयएसओ प्रमाणपत्र, देशात प्रथमच निमलष्करी दलाचा असा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 09:46 PM2017-12-21T21:46:50+5:302017-12-21T21:47:11+5:30
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भूमिका बजावणा-या संपूर्ण देशात व महाराष्ट्रातील निमलष्करी दलामध्ये राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक २ ला (एसआरपीएफ) आयएसओ ९००१-२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे.
पुणे : राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भूमिका बजावणा-या संपूर्ण देशात व महाराष्ट्रातील निमलष्करी दलामध्ये राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक २ ला (एसआरपीएफ) आयएसओ ९००१-२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. देशात प्रथमच निमलष्करी दलाचा असा सन्मान झाला आहे, अशी माहिती एसआरपीएफ बल गट क्रमांक दोनचे समादेशक सारंग आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस महासंचालक कार्यालयाने पुण्यातील एसआरपीएफ बल गट क्रमांक २ ची ‘स्मार्ट गट’ म्हणून २०१६ मध्ये निवड केली होती.
याबाबत सारंग आव्हाड यांनी सांगितले की, एसआरपीएफला आयएसओ प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यासाठी गटातील समादेशक कार्यालय, कंपनी कार्यालये, मोटार परिवहन विभाग, बिनतारी संदेश विभाग, गट रूग्णालय यातील कर्मचारी, अधिकारी यांना आयएसओ बाबत माहिती देण्यात आली. याची गरज लक्षात आणुन देण्यात आली. त्यानुसार त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
प्रस्ताव तयार करण्यासाठी समन्वय अधिकारी नेमण्यात आले. कार्यालयीन कामकाज पद्धती, कार्यप्रणाली, आरखडाबद्ध अभिलेख तयार करणे यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. कार्यालयाची कार्यप्रणाली, अभिलेख अनियमिततेमुळे निर्माण झालेले धोके आणि त्यावरील उपाय योजना, संधी, व्याप्ती याचा आराखडा तयार केला होता.
एसआरपीएफमध्ये १९५५ पासूनचे कागदपत्र जमा झाली होती. त्यातील महत्वाचे आदेश, कार्यालयीन परिपत्रक हे तपासून कालबद्ध झालेले कागदपत्र बाद केली. त्यातून तब्बल ५ टन रद्दी नष्ट करण्यात आली आहे. एसआरपीएफमध्ये अ, ब, क या वर्गर्वारीनुसार कागदपत्रांचे जतन करण्यात आले आहे. एसआरपीएफकडून चालणारे विविध उपक्रम, वेलफेअर फंडाचे वितरण याची दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे प्रथमच निम लष्करी दलाला आएसओ ९००१-२०१५ मानांकन मिळाले आहे, असे सारंग आव्हाड यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी प्रमाणेच पोलीस दलातील स्मार्ट पोलीस दल म्हणून २०१६ साली आमच्या राज्य राखीव पोलीस दल ग्रुप नं २ला पारितोषिक मिळाले आणि त्यातूनच आय एस ओ चे मानांकन मिळवण्यासाठी प्रेरणा मिळाली. ग्रुप नं २ मध्ये कर्मचारी व पोलिस दलातील व्यक्तीसाठी रुग्णालय सुरु केले आहे तसेच राहण्यासाठी सदनिका बांधण्यात येणार आहेत आणि तसा प्रस्ताव ही मान्य करुन घेण्यात आला आहे. २०० एकर च्या निसर्गाची देणगी लाभलेल्या झाडांच्या देखभालीसह या ठिकाणी डाळिंब, सिताफळ, लिंबू, आंबा यांच्या बागा फुलवल्या आहेत. ग्रुप २ मध्ये पोलिस दलासाठी आरोग्य शिबीर, व्यसनमुक्ती शिबीर, योगा, संगणकीय ज्ञान यावर पुर्णपणे लक्ष केंद्रीय केले जाते. त्याचप्रमाणे येथे शालेय मुलांची शिबीराचे ही आयोजन केले जाते.
- सारंग आव्हाड, समादेशक, एसआरपीएफ गट क्रं2