चंद्रलोकीचा वेध घेणारे ''विक्रम अन् प्रज्ञान'' सोमवारी पहाटे झेपावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 08:59 AM2019-07-14T08:59:59+5:302019-07-14T09:00:02+5:30
चंद्रयान १, मंगळयान आणि अवकाशात एकाचवेळी १०० पेक्षा जास्त उपग्रह सोडून भारताने अवकाश क्षेत्रातील ताकदीवर या पूर्वीच शिक्कामोर्तब केले आहे. सोमवारी (दि. १५) पहाटे चंद्रयान २ मोहिमेंतर्गत चंद्रावर विक्रम (लँण्डर) आणि प्रज्ञान (रोव्हर) पाठविले जाणार आहे.
निनाद देशमुख
पुणे : चंद्रयान १, मंगळयान आणि अवकाशात एकाचवेळी १०० पेक्षा जास्त उपग्रह सोडून भारताने अवकाश क्षेत्रातील ताकदीवर या पूर्वीच शिक्कामोर्तब केले आहे. सोमवारी (दि. १५) पहाटे चंद्रयान २ मोहिमेंतर्गत चंद्रावर विक्रम (लँण्डर) आणि प्रज्ञान (रोव्हर) पाठविले जाणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास या प्रकारची शक्ती असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश भारत ठरणार आहे. चंद्रावर पाण्याचे अस्तित्व तसेच तेथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करणे हा असला तरी या मोहिमेतून भारताच्या येणाऱ्या अवकाश मोहिमांसाठी हा अनुभव मैलाचा दगड ठरणार आहे.
इस्रोने २००८ मध्ये चंद्रयान १ आणि त्यानंतर मंगळयान मोहीम यशस्वी करून अंतराळ क्षेत्रातील आपली ताकद सिद्ध केली. चंद्रयान १ मोहिमेत इस्रोच्या यानाने चंद्रावर बर्फरूपात पाणी असल्याचा शोध लावला होता. याला जगातील पहिल्या क्रमांकाची अवकाश संशोधन संस्था नासानेही दुजोरा दिला होता. यामुळे इस्रोची ‘चंद्रयान २’ मोहीम ही खूप महत्त्वाची ठरते.
सोमवारी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क ३’ या शक्तिशाली प्रक्षेपास्त्राच्या साह्याने हे यान चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी इस्रोचे शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत घेत आहेत. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा या यानावर असतील. मोहिमेतील सर्व यंत्रणा भारतीय बनावटीची आहे हे विशेष. एक हजार कोटी रुपयांचा खर्च यासाठी झाला आहे. यानाच्या चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगसाठी चंद्राच्या दक्षिण धु्रवाची निवड केली आहे. समतल प्रदेश असल्यामुळे हा भाग निवडला आहे. या यानाचे वजन जवळपास ३ हजार २५० किलो आहे. याचे तीन भाग आहेत. चंद्रावर उतरण्यासाठी ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर तयार केले आहेत. प्रक्षेपणानंतर काही दिवस यान पृथ्वीभोवती फिरणार आहे. त्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर यान चंद्रावर पाठविण्यात येणार आहे.
बंगळुरुतील मुख्यालयातून नियंत्रण
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मॅनझिनस सी व सिमपेलियस एन या विवरांवर हे यान उतरेल. आर्बिटरमधून लँडर (विक्रम) यान चंद्रावर उतरेल. त्यातून प्रज्ञान रोव्हर हे चंद्राच्या भूपृष्ठावर उतरेल. प्रज्ञान रोव्हरचे वजन जवळपास २५ ते ३० किलो आहे. चाकांच्या साह्याने ते चंद्रावर चालणार आहे. यानाचे नियंत्रण बंगळुरु येथील इस्रोच्या मुख्यालयातून होणार आहे.
इस्रोकडून गगनयान मोहिमेचीही तयारी
चंद्रयान १, चंद्रयान २, मंगळयान या बरोबरच येत्या काळात अंतराळात मानव पाठविण्यासाठी गगनयान मोहीम इस्रोने आखली आहे. भारतीय प्रक्षेपक पीएसएलव्ही आणि जीएसएलव्हीच्या साह्याने १०४ अंतरिक्ष मोहिमा आखल्या आहेत. यात ७३ प्रमोचन मिशन, १० विद्यार्थी उपग्रह तसेच ३३ देशांचे २९७ उपग्रह अंतराळात सोडले आहेत.