कोंढरीच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:10 AM2021-07-30T04:10:56+5:302021-07-30T04:10:56+5:30
भोर : भूस्खलनामुळे कोंढरी गावाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुरक्षित जागेत जाण्यासाठी ग्रामसभेत ठराव करून तो शासनाकडे ...
भोर : भूस्खलनामुळे कोंढरी गावाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुरक्षित जागेत जाण्यासाठी ग्रामसभेत ठराव करून तो शासनाकडे सादर करावा. त्याबाबत पाठपुरावा करून पुढील पावसाळ्यापूर्वी काेंढरीचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले.
भोर तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नांदगाव, कंकवाडी येथील भातशेती, कंकवाडी येथील प्राथमिक शाळेच्या नुकसानीची पाहणी करत उपाययोजनांबाबत नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाकडून माहिती घेतली. त्याचबरोबर भूस्खलन झालेल्या कोंढरी ग्रामस्थांचीही भेट घेत त्यांना धीर दिला. या वेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, संतोष चव्हाण, हिरामण शेवाळे, बाळासो चांदेरे, कुलदीप कोंडे, अमोल पांगारे, स्वाती ढमाले, युवराज जेधे, नितीन सोनावणे, दीपक बर्डे, हनुमंत कंक, गोर्वधन बांदल, गणेश धुमाळ, बाळासो जायगुडे, माऊली शिंदे, ज्ञानेश्वर मांढरे उपस्थित होते.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, कोंढरी गावाच्या पुनर्वसनाबाबत स्थानिक आमदार, खासदार यांना बरोबर घेऊन लागणारा निधी मंजूर करून पुढच्या पावसाळ्यापर्यंत हा प्रश्न मार्गी लावला जाईल. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. दराडीमुळे रस्ता बंद होऊन संर्पक तुटलेल्या गावातील वयोवृद्ध नागरिक व गरोदर माता यांना औषधोपचार कसे मिळतील यासंदर्भात वेळीच उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भोर तालुक्यात पर्यटन वाढीसाठी आणि औद्योगिक वसाहत होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
२९ भोर कोंढरी
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना नीलम गाेऱ्हे व इतर.