गावाला लागलेला ठपका पुसण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 06:52 AM2018-12-24T06:52:17+5:302018-12-24T06:52:27+5:30
कोरेगाव भीमातील विजयस्तंभाला वंदनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार कसा पडेल, याची गडबड आता सुरू आहे. ‘काहीही करून आमच्या गावाला लागलेला ठपका’ या निमित्ताने पुसून काढायचा आहे, अशी भावना कोरेगाव भीमातील गावकऱ्यांची आहे.
- युगंधर ताजणे
पुणे : कोरेगाव भीमातील विजयस्तंभाला वंदनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार कसा पडेल, याची गडबड आता सुरू आहे. ‘काहीही करून आमच्या गावाला लागलेला ठपका’ या निमित्ताने पुसून काढायचा आहे, अशी भावना कोरेगाव भीमातील गावकऱ्यांची आहे.
कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. आता वातावरण शांत असून त्याविषयी कोरेगाव भीमा गावातील सचिन कडलग यांना विचारले असता ते म्हणाले, कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी प्रशासन गावोगावी बैठका घेत आहेत. पूर्वीचा कुठलाही संघर्ष, राग कुणाच्या मनात नाही. येणाºया कार्यक्रमाला सर्वांचे सहकार्य राहील.
सभा, स्वागत, यासाठी २३ विविध संघटनांकडून प्रशासनाकडे निवेदने गेली असून अद्याप त्यापैकी कुणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. यावर्षी प्रकाश आंबेडकर यांची सभा या ठिकाणी होणार असल्याची चर्चा असून याबरोबर इतर आंबेडकरी पक्षांनीदेखील सभेच्या परवानगीसाठी अर्ज केले आहेत.
भीमसैनिक नगरमधून काढणार दुचाकी रॅली
येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी एक जानेवारीला नगर जिल्ह्यातून एक हजारांहून अधिक भीमसैनिकांची दुचाकी रॅली जाणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी बैठक झाली. तसेच चंद्रपूर येथून येणाºया रॅलीचे स्वागत नगरमध्ये २६ डिसेंबरला करण्यात येणार आहे.