साहित्य जगतातील इलाहींची पोकळी भरून काढणे अवघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:11 AM2021-02-09T04:11:35+5:302021-02-09T04:11:35+5:30
पुणे : “ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार हे आशयघन, भावविभोर गझलरचनांमुळे रसिकांच्या हृदयसिंहासनावर आरूढ झालेले महाकवी होते. गझलेच्या आशयघनतेमुळे त्यांच्या ...
पुणे : “ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार हे आशयघन, भावविभोर गझलरचनांमुळे रसिकांच्या हृदयसिंहासनावर आरूढ झालेले महाकवी होते. गझलेच्या आशयघनतेमुळे त्यांच्या सशक्त गझलेचा महाराष्ट्र वेडा होता. साहित्य जगतातील त्यांची पोकळी आता भरून निघणे अवघड आहे,” अशी भावना शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी व्यक्त केली.
पुण्याच्या सांस्कृतिक नगरीत इलाही यांनी स्थापन केलेली संस्कृती संवर्धन संस्था आणि इलाही जमादार फॅन क्लबच्या वतीने राष्ट्र सेवा दलाच्या रावसाहेब पटवर्धन महाविद्यालयातील एस. एम. जोशी प्रशिक्षण हॉलमधे इलाही जमादार श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
संस्थेचे अध्यक्ष आणि गझलकार संतोष घुले, प्रशांत दिंडोकर, प्रमोद खराडे, मुकीम तांबोळी, अनिल धोत्रे, शाहिर गंगाधर रासगे, चित्रकार अभिजित धोत्रे, मंगेश रूपटक्के, सचिन पाठक, सुहास दिंडोकर आदी यावेळी उपस्थित होते. संतोष घुले यांनी इलाही गेल्याने मराठी गझलेचा साक्षात आत्मा अंतर्धान पावल्याची भावना व्यक्त केली. संस्थेच्या सचिव प्रा. राजश्री कसबे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दामोदर मकाशीर यांनी आभार मानले.