स्वारगेटची वाहतूककोंडी सुटणे कठीणच
By admin | Published: May 15, 2017 06:44 AM2017-05-15T06:44:45+5:302017-05-15T06:44:45+5:30
स्वारगेट चौकातील वाहतूककोंडी आता सुटणार, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्वारगेट चौकातील वाहतूककोंडी आता सुटणार, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, ही कोंडी सुटण्याऐवजी भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र, चौकामध्ये सुधारणा करताना पादचाऱ्यांबाबत नियोजनच करण्यात आलेले नाही. ज्या मार्गावरून एसटी आणि पीएमपी बस जाणार आहेत त्या रस्त्यांची रुंदी अतिशय कमी झाली आहे. बेकायदा वाहतूक करणारी वाहने, अतिक्रमणे आणि रस्त्यांवरून जाणारी वाहनांची संख्या पाहता भविष्यात या ठिकाणी वाहतुकीची समस्या उद्भवणार असल्याचे चित्र आहे.
स्वारगेट चौकामध्ये एसटी बस स्थानक आणि पीएमपी बस स्थानक आहे. या ठिकाणी भविष्यात मेट्रो स्टेशनही होणार आहे. सध्या या चौकामधून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांची संख्या जवळपास एक लाखाच्या आसपास आहे. स्वारगेट चौकाची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रस्तावामध्ये सोलापूर रस्त्याकडून सारसबागेकडे जाणारा ग्रेड सेपरेटर बांधण्यात येणार असल्याचेही नियोजन होते. हा प्रस्ताव जेव्हा वाहतूक पोलिसांकडे परवानगीसाठी सादर करण्यात आला, तेव्हा तत्कालीन वाहतूक उपायुक्त विश्वास पांढरे यांनी काही मुद्दे उपस्थित करून पादचाऱ्यांबाबतचे नियोजन कसे करणार, याची विचारणा केली होती.
सातारा रस्त्यावरून आलेल्या पुलाचे दोन पदर सारसबाग आणि हडपसरच्या दिशेने जातात, तर हडपसरकडून आलेली वाहतूक एसटी स्थानकासमोरील समांतर उड्डाणपुलावरून साईबाबा मंदिरापर्यंत नेऊन सोडण्यात आलेली आहे. पुलाखालून जाणाऱ्या रस्त्यांचे मात्र नियोजन चुकल्याचे चित्र आहे. स्वारगेट चौकामध्ये सर्वात मुख्य समस्या ही पादचाऱ्यांची आहे. सध्याचे नियोजन पाहता भविष्यात या ठिकाणी अपघात वाढण्याची शक्यता आहे. एसटी, पीएमपी स्थानक, मेट्रो स्टेशनमुळे या भागात कमर्शियल कॉम्प्लेक्सही मोठ्या प्रमाणावर उभे राहणार आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. ही समस्या सोडवण्यासाठी केवळ एक सिग्नल बसवून उपाय सापडणार का, असा प्रश्न आहे.
डेक्कन येथील गरवारे पुलाच्या धर्तीवर स्वारगेट येथील रस्त्याची उंची वाढवून पादचाऱ्यांसाठी भूमिगत रस्ता देण्यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी सुचवले होते. परंतु ग्रेड सेपरेटर होणार असल्याने असे करता येणार नसल्याचे एमएसआरडीसी आणि महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले होते. त्या वेळी ग्रेड सेपरेटरच्या खालून भूमिगत पादचारी मार्ग तयार करण्याचा प्रस्तावही वाहतूक पोलिसांनी दिला होता.