‘आयटी' कर्मचाऱ्यांना हवी मतदानासाठी सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 12:34 PM2019-04-09T12:34:49+5:302019-04-09T12:35:56+5:30
लोकशाहीमध्ये मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्क आहे. मात्र आयटी कंपन्यामधील कर्मचा-यांना या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे.
पुणे : मतदानाच्या दिवशी आयटी कंपन्यांना सुट्टी जाहीर करण्यात येत असली तरी तरी महत्वाचे प्रोजेक्ट असल्याचे कारण पुढे करीत अनेक कंपन्या कर्मचा-यांना मतदानाच्या दिवशी देखील कामावर येण्यास भाग पाडतात. त्यामुळे पुण्याबाहेरील कर्मचा-यांना मतदानापासून वंचित राहावे लागते. आयटीमधील केवळ 60 टक्केच कर्मचारीच मतदानाचा हक्क बजावू शकतात, याकडे लक्ष वेधत सर्व कर्मचा-यांना मतदानाचा हक्क मिळण्याकरिता ऑल इंडिया फोरम फॉर आयटी/आयटीज एम्प्लॉईज, ( फाईट) महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने कामगार सहआयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
लोकशाहीमध्ये मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्क आहे. मात्र आयटी कंपन्यामधील कर्मचा-यांना या हक्कापासून वंचित ठेवले जात आहे. संपूर्ण देशभरात जवळपास 56 लाख आयटी कर्मचारी आहेत. स्वत:चे गाव सोडून अनेक कर्मचारी नोकरीसाठी अनेक ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. पुण्यातही जवळपास 5 ते 6 लाख कर्मचारी स्थायिक आहेत. त्यातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी हे महाराष्ट्रातल्या विविध भागातून आले आहेत. हे कर्मचारी दुस-या भागात स्थलांतरित झाले असले तरी त्यांचे नाव मूळ गावच्याच मतदारयादीत आहे. त्यामुळे मतदानासाठी त्यांना मूळ गावी जाणे भाग आहे. आयटी कंपन्यांकडून मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात येत असली तरी महत्वाचे प्रोजेक्ट असल्याचे कारण सांगत कर्मचा-यांना कंपनीमध्ये बोलावले जाते आणि वेळ मिळेल तसे मतदान करूया असे सांगितले जाते. मतदानाच्या दिवशी कर्मचा-यांना कामावर बोलावणे हा भारतीय दंडविधान कलम 135 बी चा भंग आहे. परंतु कामावर बोलावल्यामुळे पुण्याबाहेरील कर्मचा-यांना मतदानाला मुकावे लागते. कर्मचा-यांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी कामगार सहआयुक्त निखिल वाळके यांनी निवेदन देण्यात आल्याची माहिती फाईटचे प्रदेशाध्यक्ष परमजित माने यांनी दिली.
------------------------------------------------------------