आयटी अभियंते ‘हायजॅक ’
By admin | Published: August 29, 2016 03:14 AM2016-08-29T03:14:47+5:302016-08-29T03:14:47+5:30
हिंजवडीतील मुख्य रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा बसला आहे. पोलीस व एमआयडीसी प्रशासनाच्या कृपाशीर्वादाने हिंजवडीतील सर्व मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण झाले असून पथारीवाले
वाकड : हिंजवडीतील मुख्य रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा बसला आहे. पोलीस व एमआयडीसी प्रशासनाच्या कृपाशीर्वादाने हिंजवडीतील सर्व मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण झाले असून पथारीवाले, फेरीवाले, फळविक्रेते, भाजीविक्रेत्यांनी पदपथासह मुख्य रस्त्यांवरील दोन्ही लेनमध्ये बस्तान मांडून जागा बळकावल्या आहेत.
हिंजवडीतील शिवाजी चौकात चोहोबाजूंनी अतिक्रमण झाले आहे. यासह एमआयडीसीच्या हद्दीत असलेल्या रस्त्यांवर दुतर्फा अतिक्रमण झाल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे.
हिंजवडीतील बहुतांश रस्ते अतिक्रमणाने व्यापल्याने वाहने धावण्यासाठी प्रशस्त रस्तेच उरलेले नाहीत. परिणामी वाहतूक ढिम्म होऊन वाहतुकीची कोंडी होते. शिवाजी चौक ते मेझा नाईन चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. तसेच माणरोडला देखील अनेकांनी पदपथ गिळंकृत केले आहे. वाकड-हिंजवडी रस्त्यावर भुजबळवस्तीवरील अतिक्रमण महापालिकेला दूर करता आलेले नाही, तर भूमकरवस्ती व डांगे चौक रस्त्यावरदेखील अतिक्रमणांची समस्या वाढतच आहे. त्यामुळे रस्ते कितीही प्रशस्त झाले, तरी अतिक्रमणाच्या विळख्यात त्यांचा श्वास कोंडला असल्याचे चित्र पाहायला मिळते.
आयटी सेक्टरमध्ये जरी प्रशस्त रस्ते बनवले असले, तरी एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यांवरही हॉटेलचालक व हातगाड्यावाल्यांनी जागा बळकावल्या आहेत. काहींनी तर पत्राशेड मारून अनधिकृत हॉटेल व्यवसाय सुरू केले आहे, तर फेज एकमध्ये एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या बाजूच्या रस्त्यावर खाऊगल्ली व चौपाटी तयार झाली आहे. प्रशासनाकडून कारवाईचा केवळ फार्स केला जातो. त्यानंतर परिस्थिती पूर्ववत होत असल्याचे चित्र आहे.
अनधिकृत सहाआसनी रिक्षा रस्त्यावर बिनबोभाटपणे अस्ताव्यस्त लावल्या जातात. यामुळे वाहनांना तर अडचण होतेच यासह पादचाऱ्यांनादेखील जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालत जावे लागते. भर रस्त्यांवर वाहने पार्क करून स्थानिकांनी जणू ती कायदेशीर पार्किंगच बनविले असल्याचे चित्र काही रस्त्यावर दिसते. सर्वत्र वाहनांच्या रांगा आणि हातगाड्यांची गर्दी अशी अवस्था बहुतेक चौकात आहे. काही स्थानिकांनी शासकीय फुटपाथदेखील भाड्याने दिले आहेत.
आयटीतील बहुतेक रस्ते प्रशस्त असले, तरी काही मुख्य चौकात आयटीकडे जाणारी वाहतूक अडकते. सकाळी आठ ते १२ अन् सायंकाळी चार ते रात्री नऊ या कालावधीत येथे वाहतूककोंडी नित्याची बनली आहे. सायंकाळी हिंजवडी-माण रस्त्यावर फेज एक इन्फोसिस सर्कलपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात, तर केपीआयटी रस्त्यावरदेखील रांगा लागतात. (वार्ताहर)