मध्यस्थी करून वाद मिटविणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:16 AM2021-08-24T04:16:08+5:302021-08-24T04:16:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दोन व्यक्तीमधील वाद मिटविणे तरुणाला चांगलेच महागात पडले. भांडणे मिटविल्याच्या रागातून १० ते ११ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दोन व्यक्तीमधील वाद मिटविणे तरुणाला चांगलेच महागात पडले. भांडणे मिटविल्याच्या रागातून १० ते ११ जणांच्या टोळक्याने दोघा तरुणांवर कोयत्याने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना आंबेगाव खुर्दमधील जांभूळवाडी रोडवरील समृद्धी लेकशायर सोसायटीसमोर शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
आकाश पवार (वय २४, रा. आंबेगाव बुद्रूक) व प्रथमेश अशी या घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी, शुभम हिरे (वय १९, रा. शनिनगर, जांभूळवाडी रोड आंबेगाव खुर्द), तुकाराम येनपुरे (वय ५२, रा. लिपाने वस्ती, जांभूळवाडी रोड) या दोघांना अटक केली असून, त्यांच्यासह इतर साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आकाश पवार या तरुणाने फिर्याद दिली आहे.
आकाश पवार याने यापूर्वी आरोपी बंटी आणि दुसऱ्या एका व्यक्तीचा वाद मिटविला होता. त्याच कारणाच्या रागातून बंटी व त्याच्या इतर साथीदारांनी फिर्यादी पवार व त्यांचा मित्र प्रथमेश याला शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर दोघांवर कोयत्याने वार केले. त्यानंतर टोळक्याने तेथील परिसरातील वाहनांची कोयत्याने तोडफोड करत वाहनांचे नुकसान करून कोयते हवेत नाचवत दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. आर. कवठेकर तपास करीत आहेत.