निवडणुका लक्षात न ठेवलेल्याच बऱ्या : डॉ. हमीद दाभोलकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 12:12 PM2019-04-09T12:12:57+5:302019-04-09T12:13:44+5:30
गेल्या चारही निवडणुकाच्या मध्ये माझ्यासाठी मुद्दाम लक्षात राहावी अशी एकही आठवण नाही.
थोडे धाडसी विधान होईल पण अगदी प्रामाणिकपणे साांगायचे झाले, तर मी मतदान केलेल्या गेल्या चारही निवडणुकाच्या मध्ये माझ्यासाठी मुद्दाम लक्षात राहावी अशी एकही आठवण नाही. मी अजिबात निराशावादी नाही. पण माझ्या निवडणुकीशी संबंधित बहुतांश आठवणी ह्या लवकरात लवकर विसरून गेले तर बरे अशा स्वरूपाच्या आहेत.
वरील दोन्ही विधाने मी अगदी गाांभीर्याने करतो आहे. माझा असा अंदाज आहे, की माझ्यासारखा अनुभव असलेला वर्ग गेल्या दोन दशकात आपल्या देशात वाढत चालला आहे. लोकशाही आणि निवडणूक प्रकिया ह्याचे अनन्यसाधारण महत्व वाटणाऱ्या नागरिकांना देखील येणारा हा अनुभव आपण समजून घेतला पाहिजे असे वाटते. सामान्य माणसाचे जगणे , लोकांचे प्रश्न आणि निवडणुकांची प्रकिया ह्यांच्या मध्ये जे तुटले पण आले आहे, त्या त्यामधून ही भावना वाढीस लागते आहे. असे मला वाटते.
एका बाजूला धर्माच्या नावावर अधर्म पसरवणारे भाजप, शिवसेना आणि एम आय एम सारखे पक्ष दुसऱ्या बाजूला भ्रष्ट आणि सोईनुसार धर्माचा वापर करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखे पक्ष, समाज मनाशी सांधा तुटल्याने प्रभावहीन झालेले डावे पक्ष आणि आपल्या दैनंदिन आयुष्यातील लोकशाही कर्त्यव्याच्या विषयी टोकाचे असंवेदनशील झालेले आपण नागरिक ह्यांच्यामधनू एक चौफेर कोंडी तयार झाली आहे. सातत्याने फारसा फरक नसलेल्या दोन वाईट पर्यायांच्या मधूनच निवड करावी लागत आहे. गमतीचा भाग म्हणजे कोणाचीही निवड केली, तरी आरोग्य शिक्षण सार्वजनिक सेवा प्रशासन ह्यामध्ये अपवाद सोडले तर सकारात्मक बदल होताना जवळजवळ दिसत नाही. अशा वेळी निवडणुकीत मुद्दामहून आठवणीत ठेवावे असे काही घडणे अवघड नाही का? त्यातल्या त्यात आठवणीत राहिलेला भाग म्हणजे २०१३ च्या निवडणुकीत नागरिक म्हणून आपल्याला मिळालेला नोटाचा अधिकार. तो अजिबातच सकारात्मक नाही हे माहित असताना देखील ही कोंडी फोडण्याची काही तरी शक्यता त्या मधून निर्माण होऊ शकते असे वाटते.
मतदान करणे हे लोकशाहीतील सर्वात पवित्र कर्तव्य आहे. हे वाक्य अर्ध सत्य आहे. मतदानाच्या नंतरचे जास्त पवित्र कर्तव्य हे सजग नागरिक म्हणून लोकशाहीच्या अंमलबजावणीमध्ये सहभागी होणे आहे. हे आपण सोयीस्कर विसरतो. आपण मतदान केले की लोकशाही मध्ये सर्व काही आपोआप सुरळीत चाले असे अध्यारुत धरलेले आहे. त्यामुळेच सध्याच्या निवडणुका ह्या लक्षात ठेवण्यापेक्षा लवकरात लवकर विसरून जाव्या अशा झाल्या आहेत. पक्षीय राजकारण हे जेव्हा निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही वेठीस धरते तेव्हा नागरिकांना आपल्या कार्यक्षेत्रात दैनंदिन जीवनात लोकशाही सक्षम व्हावी म्हणून दीर्घ काळ कार्यकरत राहावे लागते. हे आपण आज केले, तर कदाचित येणाऱ्या पिढ्यांच्या लक्षात राहाव्यात अशा निवडणुका होतील. अशी लोकशाही आपण घडवू शकू असे वाटते.
(शब्दांकन - अमोल अवचिते)