‘आयटी’तील तरुणांच्या हाती कुदळ अन् फावडे
By admin | Published: June 28, 2017 11:25 PM2017-06-28T23:25:15+5:302017-06-28T23:25:15+5:30
‘आयटी’तील तरुणांच्या हाती कुदळ अन् फावडे
अजय जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उंब्रज : लाखो रुपयांचे पॅकेज, शनिवार, रविवार सुट्टी... या सुटीत फुल्ल टू धमाल करायची... हा विचार ‘आयटी’तील तरुणाई करताना दिसतात. पण यालाही काहीजण अपवाद ठरतात. साताऱ्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात आलेल्या तरुणांनी ‘व्हायब्रण्ट एच आर भटकंती’ गु्रप स्थापन केला आहे. हे तरुण विकेंडला ग्रामीण भागात जाऊन सामाजिक कार्य करत आहेत.
‘जल है तो कल है,’ हा विचार तरुणाईच्या डोक्यात घोळू लागला आहे. हाच विचार आता तरुणाईला ‘विकेंड एन्जॉय’ करण्यासाठी वरदान देऊन जात आहे. ‘वॉटर कप’ स्पर्धेत उतरलेली तरुणाई जलसंधारणाची कामे करण्यासाठी एकवटली होती.
कऱ्हाड तालुक्यातील वडोली-भिकेश्वर येथील शंकर साळुंखे या तरुणाने युवक, युवतींना एकत्र आणले. पुणे येथील स्थायिक झालेल्या युवक युवतींनी ‘व्हायब्रण्ट एच आर भटकंती’ हा ग्रुप निर्माण केला. त्यांच्यात समाजसेवेचा विचार पेरून पुणे येथील घोरावडेश्वरच्या डोंगरावर त्यांनी जलसंधारणाचे काम सुरू केले.
गेल्यावर्षी घोरावडेश्वरच्या डोंगरावर या ग्रुपतर्फे शेकडो झाडे लावली. खालून कॅनच्या साह्याने पाणी नेऊन झाडे जगवली. भर उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू लागली आणि घोरावडेश्वरच्या डोंगरावर पाणी उपलब्ध होण्यासाठी यंदा जलसंधारणाचे काम हाती घेतले.
सुटीच्या दिवशी या युवक-युवतींनी घोरावडेश्वरच्या माथ्यावर तळ्यासारख्या भागाचे खोदकाम करून बांध उभारला. यामध्ये सुमारे दोन लाख लिटर पाणिसाठा अपेक्षित आहे. या पाण्याच्या फायदा खालील भागातील वनराईस व जलकुंड्यांना होणार आहे. काही महिन्यांपासून हे युवक सुटीच्या दिवशी सहकुटुंब डोंगरावर जातात. पाटी, खोरे घेऊन प्रत्येकजण कामाला सुरुवात करतो. बांध घालणे, चरी काढण्याचे काम करतात. त्याचवेळी काहीजण गाणे म्हणतात. विनोद सांगतात. हसत-खेळत, गप्पा मारत काम सुरूच राहते.
हा ग्रुप निर्माण होण्यापूर्वी हे सर्वजण व्हायब्रण्ट एच. आर. या संघटनेत कार्यरत होते. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर साळुंखे हे आहेत. या संघटनेत साडेतीन हजारांहून अधिक सदस्य आहेत.
या ग्रुपच्या स्थापनेत अॅड. श्रीनिवास इनामती, संभाजी काकड, अॅड. आदित्य जोशी, अॅड. विजय जगताप, विकास पनवेलकर, सुनील बागल आदींचा सहभाग आहे.
दीड हजार विद्यार्थ्यांना मदत...
‘व्हायब्रण्ट एच. आर. या संस्थेचे दोन वर्षांत तब्बल ३,८०० सभासद झाले आहेत. सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण या विषयावर विविध उपक्रम संस्था राबवत असते. संस्थेतर्फे सदस्यांना कामगार व औद्योगिक कायद्यांची माहिती देण्यासाठी १२० बैठका झाल्या. कामगार व औद्योगिक कायद्यांवर तज्ज्ञ मंडळींच्या उपस्थितीत २८ चर्चासत्रे घेतली आहेत. आठ शैक्षणिक संस्थांसोबत करार करून दीड हजार विद्यार्थ्यांना मदत केली आहे,’ अशी माहिती संस्थापक अध्यक्ष शंकर साळुंखे यांनी यानिमित्ताने दिली.
मोफत आरोग्य तपासणी...
सामाजिक बांधिलकी जपत पुणे जिह्यातील साकुर्डी गाव दत्तक घेऊन सलग दोन वर्षे गावकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी व औषध वाटप शिबिरे घेण्यात आली. पाबळ येथील आश्रमास मोफत आवश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत.