यंदा संक्रांतीला हुरडा मिळणे झाले अवघड; इंदापूरला ज्वारीचा पेरा ३६ टक्क्यांपर्यंत पोहोचला नाही; मक्याला लागली लष्करी अळीची दृष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 16:11 IST2025-01-07T16:10:50+5:302025-01-07T16:11:44+5:30

मोठ्या प्रमाणात पेरणी होवून ही मका उत्पादकांना नुकसानीस सामोरे जावे लागेल असे चित्र आहे.

It has become difficult to get hurda for Sankranti this year; Sorghum sowing in Indapur has not reached 36 percent; Maize has been affected by armyworm | यंदा संक्रांतीला हुरडा मिळणे झाले अवघड; इंदापूरला ज्वारीचा पेरा ३६ टक्क्यांपर्यंत पोहोचला नाही; मक्याला लागली लष्करी अळीची दृष्ट

यंदा संक्रांतीला हुरडा मिळणे झाले अवघड; इंदापूरला ज्वारीचा पेरा ३६ टक्क्यांपर्यंत पोहोचला नाही; मक्याला लागली लष्करी अळीची दृष्ट

- शैलेश काटे 

इंदापूर : गतवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी ही इंदापूर तालुक्यातला ज्वारीचा पेरा ३६ टक्क्यांपर्यंत पोहोचलेला नाही. सरासरीपेक्षा जवळपास दोनशे टक्के पेरणी झालेल्या मक्याच्या पिकाला ही लष्करी अळीची दृष्ट लागली आहे. त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांतीसाठी हुरडा मिळणे दुरापास्त आहे.नंतरच्या काळात ज्वारीची भाकर खाणे हे खिशाला न परवडणारे ठरणार आहे. मोठ्या प्रमाणात पेरणी होवून ही मका उत्पादकांना नुकसानीस सामोरे जावे लागेल असे चित्र आहे.

रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जाणारा इंदापूर तालुका मागील दहा वर्षांपासून फळबागा विशेषतः द्राक्ष, डाळिंबांसाठी प्रसिद्ध आहे. रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून दहा वर्षांपूर्वी ज्वारीचे नाव घेतले जात असे. मात्र, ज्वारीची कमी उत्पादकता व मजुरांची कमतरता यामुळे गव्हासारख्या तुलनेने उत्पादनास सोप्या व कमी मजुरावर येणाऱ्या पिकाकडे शेतकरी वळाला. धान्याच्या माध्यमातून कष्ट वाया जाऊ न देणारे मक्याचे पीक दुभत्या जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सोडवत असल्याने दूध उत्पादनाचा जोडधंदा करणारे शेतकरी मक्याचे पीक घेऊ लागले. पुढे अधिकच्या फायद्यासाठी फळबागांच्या लागवडीखाली क्षेत्र येऊ लागले. या तिन्ही पिकांनी ज्वारीच्या क्षेत्रावर अतिक्रमण केले. त्यामुळे ज्वारीच्या क्षेत्रात उत्तरोत्तर घट होऊ लागली.

रब्बी ज्वारीचे तालुक्यातील सरासरी क्षेत्र १२ हजार ७५९ हेक्टर आहे. गेल्या वर्षी केवळ ४ हजार ७०० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. यंदाच्या वर्षी त्यामध्ये १०९ हेक्टरने घट झाली. ४ हजार ५९१ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. ३५.९८ अशी तिची टक्केवारी आहे. इंदापूर (८५५ हेक्टर), बावडा (१ हजार ५७१ हेक्टर), सणसर (९४९ हेक्टर) व भिगवण (१ हजार २१६) अशी पेरणीची वर्गवारी आहे.

यंदाच्या वर्षी १९७.४ टक्के पेरणी झालेल्या मक्याच्या पिकाला लष्करी अळीची दृष्ट लागली आहे. त्यामुळे या पिकावर संक्रांत आली आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र ७ हजार ३७७ हेक्टर आहे. तब्बल १४ हजार ५३६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. सणसर परिसरात सर्वाधिक ४ हजार ९५९ हेक्टर, त्या खालोखाल बावडा (३ हजार ७३३ हेक्टर), इंदापूर (२ हजार ९३५ हेक्टर) व भिगवण (२ हजार ९०९ हेक्टर) अशी पेरणीच्या क्षेत्राची वर्गवारी आहे.

चाऱ्यासाठी मका (१४४.२८ टक्के), तर कडवळ (१९८.८९ टक्के) एवढ्या प्रमाणात पिके घेण्यात आली आहेत. त्यामुळे चाऱ्याची अडचण भासणार नाही, परंतु कणसेच आली नाहीत, तर मोठ्या प्रमाणात पेरणी होऊनही मका उत्पादकांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागेल, असे चित्र आहे. त्यामुळे लष्करी अळीचा वेळेत बंदोबस्त होणे आवश्यक आहे.

या भागात बागायती ज्वारी

निमसाखर -(१६० हेक्टर), खोरोची-(१३० हेक्टर), निरवांगी (१२५ हेक्टर), रेडा - (१२० हेक्टर), सराफवाडी - (९५ हेक्टर).

जिरायती ज्वारी

तरंगवाडी - (७२ हेक्टर), कळस - (७० हेक्टर), लाकडी - (६७ हेक्टर), गोखळी -(५५ हेक्टर), इंदापूर-(५१ हेक्टर). 

Web Title: It has become difficult to get hurda for Sankranti this year; Sorghum sowing in Indapur has not reached 36 percent; Maize has been affected by armyworm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.