कसबा, चिंचवड पोटनिवडणूक: मतदानाची तारीख बदलली; निवडणूक आयोगाने सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 11:39 AM2023-01-25T11:39:00+5:302023-01-25T12:42:40+5:30
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचे निवडणुक आयोगाने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते.
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचे निवडणुक आयोगाने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. या दोन्ही विधानसभा मतदार संघात २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता मतदानाची तारीख बदलण्यात आली असून २७ फेब्रुवारी ऐवजी २६ फेब्रुवारीला ही निवडणुक पार पडणार आहे. तर २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षेमुळे निवडणुकीची तारीख बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार याचीही उत्सुकता असणार आहे.
पुणे जिल्हा निवडणूक आयोगाने एक अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला होता. त्या अहवालात कसबा पेठ व पिंपरी चिंचवड निवडणुकीच्या दिवशी बारावीची परीक्षा होत असल्याचे म्हटले होते. या गोष्टीची दखल घेतल्यानंतर आयोगाने चिंचवड आणि कसबा पेठ निवडणुकीच्या तारखा बदलल्या आहेत.
निवडणूक बिनविरोध व्हावी- मंत्री चंद्रकांत पाटील
बिनविरोध निवडणूक करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी; अशी सर्वांचीच भावना आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ नये; असा सुतोवाच केला आहे. त्यामुळे गाफिल न राहता ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.