मैदानी खेळ खेळायला प्राधान्य हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:53 AM2018-02-23T00:53:30+5:302018-02-23T00:53:34+5:30
हँडबॉल या खेळाचे मार्गदर्शन करण्यामागचा उद्देश फक्त मुलांना या खेळाद्वारे नोकरी मिळवून देणे नाही, तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या खेळाद्वारे समाजासाठी तसेच आपल्या राष्ट्रासाठी उत्कृष्ट प्रकारचे खेळाडू तयार करणे
हँडबॉल या खेळाचे मार्गदर्शन करण्यामागचा उद्देश फक्त मुलांना या खेळाद्वारे नोकरी मिळवून देणे नाही, तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या खेळाद्वारे समाजासाठी तसेच आपल्या राष्ट्रासाठी उत्कृष्ट प्रकारचे खेळाडू तयार करणे, हा आहे. त्याचबरोबर, हँडबॉलच्या माध्यमातून अधिकाअधिक खेळाडूंना छत्रपती पुरस्कार मिळवून देण्याचा माझा मानस आहे, असे मत हँडबॉल खेळाचे मार्गदर्शक रूपेश मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
रूपेश मोरे म्हणाले, की मी मूळचा जुन्नर तालुक्यातील असून, वडिलांच्या बदलीनंतर हडपसरमध्ये स्थलांतरित झालो. येथे साधना विद्यालयात शिक्षण घेतले. मी १९९५मध्ये सातवी इयत्तेत असताना हँडबॉल हा खेळ खेळायला सुरुवात केली, त्या वेळी जास्त प्रमाणामध्ये सुविधा नव्हत्या. हँडबॉल हा खेळ सर्वांसाठी नवीन होता. मी अनेक वेळा नॅशनल स्पर्धेत खेळलो आहे. त्या वेळेपासून विद्यार्थ्यांना हँडबॉल खेळाविषयी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. यासाठी मला आई-वडील व पत्नीकडून प्रोत्साहन व पाठिंबा मिळाला.
भेकराईनगरच्या मैदानावर मुलींसाठी, तर साधना विद्यालयामध्ये मुलांसाठी हँडबॉल खेळाचा सराव घेतला जायचा. भेकराईनगर हे शहरालगत, पण ग्रामीण
भागात असल्याने मुलींची संख्या
त्या वेळी कमीच होती. कारण,
ग्रामीण भागातल्या मुली घरातील सर्व कामे करून हँडबॉल प्रशिक्षणासाठी येत असत. अशा परिस्थितीत त्यांना मैदानी प्रशिक्षण देणे थोडे अवघड होते.
मी आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांवर कठोर मेहनत घेतली. त्यांमधील सात मुलांना छत्रपती पुरस्काराने गौरविले गेले आहे. आजपर्यंत जे
मार्गदर्शन केले, ते पूर्णपणे
विनामूल्य केले आहे. तसेच, कोणाकडूनही कुठल्याही प्रकारचे मानधन घेतलेले नाही. माझ्या मार्गदर्शनाखाली ३५० मुले घडली आहेत. यांमधील २० ते ३० मुले आज पोलीस खात्यात कार्यरत आहेत.
खेळासाठी विविध प्रकारची शिबिरे, कॅम्पचे नियोजन करून विविध भागांमध्ये मुलांसाठी असे कॅम्प घेत असतो. तसेच, या खेळाचा जास्तीत जास्त प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम मी राबवतो, असे मोरे यांनी सांगितले.
पुणे जिल्हा हँडबॉल संघटनेच्या खजिनदार पदावर मी कार्यरत आहे. तसेच, महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. नॅशनल तसेच राज्यस्तरीय सामन्यांचे अनेकदा आयोजन केले आहे.
विविध वयोगटांतील मुलींच्या सामन्यांविषयी सांगायचे, तर आतापर्यंत मोठ्या मुलींच्या हँडबॉल सामन्यामध्ये १३ वेळा सलग प्लेस घेतलेली आहे. त्याचप्रमाणे, छोट्या वयोगटातील मुलींच्या सामन्यांमध्येदेखील सात वेळा प्लेस घेतलेली आहे. मी स्वत: आतापर्यंत ४० पेक्षाही जास्त सामन्यांमध्ये खेळलो आहेत. त्यामुळे मला भरपूर ठिकाणी प्लेस मिळाल्या आहेत, असे सांगून मोरे म्हणाले, की हँडबॉल हा मुला-मुलींसाठी खूप उपयुक्त खेळ आहे.
या खेळात स्वत:हून सर्वांनी जास्त प्रमाणामध्ये सहभाग घ्यायला हवा. कारण, आजच्या कॉम्प्युटरच्या जगामध्ये तरुण पिढी सतत आॅनलाईन व्हॉट्सअॅप, फेसबुकवर मग्न झालेली आपल्याला दिसते. मात्र, मैदानी खेळ खेळताना कोणीच दिसत नाही.
सोशल मीडियाच्या अतिरिक्त वापरामुळे मुलांना विविध प्रकारचे डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता असते.
मुलांनी जर मैदानी खेळांना प्राधान्य दिले, तर त्यांचा शारीरिक व्यायामदेखील होईल आणि आरोग्य उत्तम राहील. तसेच, हँडबॉल खेळाबद्दल त्यांना आवडदेखील निर्माण होईल. हँडबॉल या खेळामध्ये भरपूर मोठे भवितव्य आहे. या खेळाला मुलामुलींनी जास्त प्राधान्य द्यायला हवे.
या खेळात आतापर्यंत मार्गदर्शक म्हणून केलेल्या कामाची पोचपावती म्हणजे मला मिळालेला छत्रपती पुरस्कार होय. हा पुरस्कार हँडबॉल खेळाचा मार्गदर्शक म्हणून मिळाला आहे, याचा खूप आनंद होतोय. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे, हे माझे थोर भाग्य आहे, असे रूपेश मोरे यांनी सांगितले.