आजच्या घडीला लोकांचा जीव वाचणं महत्वाचं : आमदार निलेश लंके
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 10:34 PM2021-06-02T22:34:04+5:302021-06-02T22:35:07+5:30
लोकांनी मला कठीण परीस्थितीत साथ देऊन कामे करण्यासाठी निवडून दिले आहे....
सांगवी :सध्या मानसिक आधार हाच कोरोनावर एकमेव उपाय आहे.त्यांना कोरोना विरूध्द लढण्याचे आत्मबळ निर्माण करून देणे गरजेचे आहे. जागतिक महामारीच्या काळात महाराष्ट्रातील कोविड सेंटरला मदत करण्याची आवश्यकता आहे. यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात. कारण आजच्या घडीला लोकांचे जीव वाचणे हेच महत्वाचे आहे असे मत पारनेर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.
वाठार निंबाळकर (ता.फलटण) येथे दिगंबर आगवणे यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरचे उदघाटन निलेश लंके यांच्या पार पडले.या कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी लंके गेले होते. त्यानंतर परताना त्यांनी सांगवी (ता.बारामती ) येथे लक्ष्मी संकुलला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलत होते.
आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक कार्याचे महाराष्ट्र कौतुक करीत आहे. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय आमदार झालेत. महाराष्ट्रातील साखर कारखाने तसेच पक्षातील नेत्यांनी कोविड निवारणासाठी मदत करण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आवाहन केले होते. त्यानंतर लंके यांनी शरद पवारांच्या नावाने तब्बल अकराशे बेडचे कोविड सेंटर उभारून सामान्य माणसाला मदतीचा हात दिला आहे.
कोविड सेंटरला भेट देताना मास्क वापरत नसल्याने माझ्यावर अनेक टीका झाल्या.मला आता या आजराबद्दल चांगली माहिती झाली आहे. मला काहीच होतं नाही माझी आणी कोरोनाची आता मैत्री झाली आहे.ग्रामस्थांना बोलत असताना मिश्किल भाषेत ते बोलत होते. मात्र, तूम्ही वेळोवेळी मास्क वापरून काळजी घ्या असे ही आवाहन लंके यांनी यावेळी केले.
माझ्या कोविड सेंटरला ७ हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकही रुग्ण दगावला गेला नाही. लोकांनी मला कठीण परीस्थितीत साथ देऊन कामे करण्यासाठी निवडून दिले आहे. आज सगळे अडचणीत आहेत. त्यांच्या संकटसमयी मी धावून येऊन त्यांच्यासाठी दिवसरात्र कामं करत आहे. राजकीय भेदभाव बाजूला ठेवून दुसऱ्या मतदारसंघासह,परराज्यातील रुग्णांना देखील आपण उपचारांसाठी दाखल करत असून याचेच मला पुण्य लाभत आहे असे लंके म्हणाले. यावेळी लक्ष्मी संकुलच्या वतीने प्रकाश तावरे यांच्या हस्ते निलेश लंके फाउंडेशनसाठी ११ हजार रुपये मदत म्हणून देण्यात आले.