मेट्रोचे जाळे शहरात विणल्याशिवाय सार्वजनिक वाहतुकीचा ताण कमी होणे अशक्य : गिरीश बापट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 04:46 PM2019-02-14T16:46:32+5:302019-02-14T16:47:00+5:30
नागरिकांनी मागणी केलेल्या स्वारगेट कात्रज, रामवाडीच्या पुढे निगडी तसेच अन्य मार्गांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यास सुरूवात झाली आहे.
पुणे: शहरातील वाहतूकीची समस्या गंभीर झाली आहे. ती सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. मेट्रोचे, वातानुकुलित इ-बस, एचसीएमटीआर रस्ता हा सर्व त्या प्रयत्नांचाच भाग आहे. इ-बस नुकत्याच सुरू झाल्या,अल्पावधीतच ३० टक्के काम पुर्ण करण्यापर्यंत मजल गाठलेली पुणेमेट्रो लवकरच रुळांवरून धावू लागेल. तसेच संपूर्ण शहरात मेट्रोचे जाळे विणल्याशिवाय वाहतुकीचा ताण कमी होणार नाही असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
मेट्रो च्या भूयारी मागार्साठी लागणाऱ्या शाफ्टच्या कामाचे भूमिपजून बापट यांच्या हस्ते गुरूवारी सकाळी कृषी महाविद्यालच्या मैदानावर झाले. स्थानिक आमदार विजय काळे, स्थानिक नगरसेवक आदित्य माळवे, सोनाली लांडगे, राजश्री काळे तसेच मेट्रोचे प्रकल्प व्यवस्थापक रामनाथ सुब्रम्हण्यम, नगरसेवक महेश लडकत आदी यावेळी उपस्थित होते. या जागेवरून भूयारी मार्ग सुरू होणार आहे. भूयार खोदण्यासाठी लागणारे यंत्र आत जावे यासाठी एक शाफ्ट तयार करावा लागतो. त्या कामाला आज सुरूवात करण्यात आली.
बापट म्हणाले, भाजपाने सत्तेवर येण्यापुर्वी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याला प्राधान्य दिले आहे. मेट्रोच्या कामाला सुरुवातीस विलंब झाला, मात्र गतीने काम करून तो भरून काढण्यात आला. इतक्या कमी कालावधीत २८ ते ३० टक्के काम पुर्ण होणे उल्लेखनीय आहे. नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू आहे. त्यामुळे विहित मुदतीच्या आधीच म्हणजे सन २०२० मध्येच मेट्रो धावू लागेल. नागरिकांनी मागणी केलेल्या स्वारगेट कात्रज, रामवाडीच्या पुढे निगडी तसेच अन्य मार्गांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यास सुरूवात झाली आहे. मेट्रोचे जाळे शहरात सुरू झाल्याखेरीज वाहतूकीचा ताण कमी होणार नाही.
हा भूयारी मार्ग ५ किलोमीटरचा असून थेट स्वारगेट येथे निघतो. पुणे शहराच्या मध्यभागातून म्हणजे कसबा पेठ, बुधवार पेठ, मंंडई अशा ठिकाणांहून तो जमिनीखालून किमान २२ मीटर खोलीतून जाणार आहे. त्यात ५ भूयारी स्थानके असून प्रत्येक स्थानकातून जूानीवर येण्यासाठी सरकते जिने, लिफ्ट अशी व्यवस्था असणार असल्याची माहिती यावेळी मेट्रोच्या वतीने देण्यात आली. बापट यांनीही त्याचा उल्लेख करत मेट्रोचे काम सुरू असताना होत असलेल्या त्रासाबाबत पुणेकर सहनशीलता दाखवत असल्याबद्धल त्यांना धन्यवाद दिले.