महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वच राजकीय पक्षांनी, कुटुंबांनी एकत्र येणे ही चांगली गोष्ट - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 17:36 IST2025-04-21T17:35:54+5:302025-04-21T17:36:34+5:30
राजकारण बाजूला ठेवून निर्णय प्रक्रियेतील लोकांनी एकत्रित येऊन राज्याच्या विकासासाठी काम केले पाहिजे

महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वच राजकीय पक्षांनी, कुटुंबांनी एकत्र येणे ही चांगली गोष्ट - सुप्रिया सुळे
बारामती : सर्वच राजकीय पक्षांनी, कुटुंबांनी एकत्र येणे महाराष्ट्राच्या हितासाठी चांगलीच गोष्ट आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना गेले तीन महिने वारंवार विनंती करत आहे की, महाराष्ट्रातील क्राइम , शेतकरी आत्महत्या, शिक्षक आत्महत्या, महिलांवरील अत्याचार यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करा. आज राज्यात पाण्याची परिस्थिती गंभीर होत आहे. मला असे वाटते की, राजकारण बाजूला ठेवून निर्णय प्रक्रियेतील लोकांनी एकत्रित येऊन राज्याच्या विकासासाठी काम केले पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. खासदार सुप्रिया सुळे सोमवारी बारामती दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्रासाठी ठाकरे कुटुंब एकत्र आले तर हा सुवर्णक्षण असेल, त्यासाठी राज्यातील इतर राजकीय कुटुंबांनी एकत्र यावे असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे. यावर खासदार सुळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, याचे मी स्वागतच करते, खरंतर हे मीच सुरुवातीला बोलले आहे. दोघे ही एकत्र येत असतील तर तो सुवर्ण क्षणच असेल. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला त्याचे मत मांडण्याचा अधिकार आहे. अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.
उष्णता प्रचंड वाढली आहे. पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर मागील दहा-पंधरा दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातील पाण्याचा आढावा घेतला होता. १०० टक्के प्लस भरलेले उजनी धरण आज शून्यावर आले आहे. मतदार संघात जिथे जिथे टँकरची गरज आहे. तेथे जिल्हा अधिकाऱ्यांनी एक दिवसाचाही विलंब न करता आदेश देऊन टँकरची सोय करावी. असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
कांदा, दूध, सोयाबीन बाबत मी कित्येक दिवसांपासून केंद्र सरकारला बोलत आहे. मी सातत्याने केंद्र सरकारला निर्यात शुल्क सबसिडी बंद करा सांगत आहे. याचे श्रेय भगरे सर निलेश लंके यांना जाते. त्यांनी सातत्याने यावर आवाज उठवून तो ४० टक्के वरून शून्यावर आला. पवारसाहेब कृषी मंत्री असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे निर्णय घेतले जात होते. तस या सरकारला करण्यापासून कुणी रोखले आहे,असे खासदार सुळे म्हणाल्या.