Laser Show: मिरवणुकीतील लेझर शो न पाहिलेलाच बरा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 10:03 AM2022-09-20T10:03:02+5:302022-09-20T10:04:14+5:30
पाच मिलिपेक्षा अधिक पॉवर धोकादायकच...
पुणे :गणेशोत्सवातील मिरवणुकांची यंदा ऐतिहासिक वेळांची नोंद झाली. त्याचबरोबर बहुतांश मिरवणुकांमध्ये लेझर शोनेही मोठा विक्रम केला. रात्री ज्यांच्या मिरवणुका पार पडल्या नाहीत त्या मंडळांनी दुसऱ्या दिवशी भर दुपारीही लेझर आणि डिस्को लाइट सुरूच ठेवले.
लाइटसमोर मोठ्या हौशेने नाचणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र त्या लेझर शोमुळे अंधत्व येऊ शकते याची कल्पनाही त्यांना आली नाही; परंतु अनेकांच्या डोळ्यात लेझर किरणे थेट गेल्याने त्यांच्या डोळ्यांना इजा झाल्याचे अनेक केसेस समोर आल्या. त्यामुळे मिरवणुकीतील लेझर शो न पाहिलेलाच बरा, असा सल्ला नेत्ररोग तज्ज्ञांनी दिला आहे.
पाच मिलिपेक्षा अधिक पॉवर धोकादायकच
पाच मिलि व्हॅॅट (5MW) जास्त पॉवर असलेल्या लेझरची किरणे डोळ्यातील रेटिनल लेअर अक्षरश: जाळू शकतात. डोळ्याच्या सर्वांत संवेदनशील भागात छिद्र पाडू शकतात. ब्लू लाइट लेझर पॉइंटर हा तर सर्वाधिक धोकादायक असतो. कारण त्याने डोळे दीपत नसल्याने लोक त्याकडे सहजपणे पाहतात व त्याची किरणे थेट डोळ्यांत प्रवेश करून डोळ्यांना इजा करतात.
तुलनेने लाल किंवा केशरी किरणांमुळे डोळे दीपतात, त्यामुळे लोक ते जास्त वेळ पाहण्याचे टाळतात आणि कमी एक्सपोजरच्या तुलनेने कमी इजा होते. तरंगलांबी, रेडिएशन आणि एक्सपोजर वेळेनुसार लेझज डोळ्यातील पडदा, कॉर्निया आणि लेन्सला मोठ्या प्रमाणात इजा करतात, त्यामुळे दृष्टी कायमची नष्ट होते.
लेझर लाइटस्च्या एक्सपोजरचा असा होतो परिणाम
१. मॅक्युलर होल - मध्यवर्ती दृष्टीसाठी जबाबदार डोळ्याच्या भागामध्ये तुटणे
२. डोळ्यातील पडद्याच्या विविध भागांत रक्तस्राव
३. रेटिना व्यत्यय (रेटिनामधील पोकळी)
४. दृष्टी पुनर्प्राप्ती काही प्रकरणांमध्ये उत्स्फूर्तपणे होऊ शकते; परंतु बहुतेकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असते.
डोळ्यांमध्ये लेझर बर्नची लक्षणे काय आहेत?
१. डोळ्यात पाणी येणे
२. दृष्टी अस्पष्ट होणे
३. डोळ्यांत सूज येणे
४. डोळ्यांसमोर काजवे चमकणे,
५. डोकेदुखी
प्रतिबंधात्मक उपाय
१. लेझर किरणांकडे उघड्या डोळ्यांनी पाहू नका.
२. डोळ्याची पापणी ही सर्वांत मोठी संरक्षण यंत्रणा आहे, त्याचा वापर करा
३. मुलांना लेझर पॉइंटर्स/लेझर एमिटिंग खेळणी खरेदी करू नका.
मिरवणुकांमधून ५ मिलि व्हॅॅटपेक्षा अधिक लेझर लाइटची किरणे थेट डोळ्यात गेल्याने दृष्टिदोष निर्माण झालेले अनेक रुग्ण आमच्याकडे येतात. त्यांच्यावर औषधोपचार करून दोष दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतोच, पण त्यांना कायमस्वरूपी चष्मा वापरावा लागतो, तर काहींवर थेट शस्त्रक्रियाही करावी लागते. त्यामुळे लेझर किरणे थेट डोळ्यात जाऊ नये याची काळजी घ्यावी.
- डॉ. सारिका सेठिया, नेत्ररोगतज्ज्ञ