पक्ष्यांचं जगणं मुश्किल; माणसांचेही जीव जातायेत, नायलॉन मांजा ठरतोय घातक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 02:30 PM2023-01-13T14:30:51+5:302023-01-13T14:31:09+5:30

नायलॉन मांजावर सरकारने बंदी घातली असली तरी बाजारात सर्रास विक्री सुरू

It is difficult for birds to survive Even human lives are lost nylon manja is becoming dangerous | पक्ष्यांचं जगणं मुश्किल; माणसांचेही जीव जातायेत, नायलॉन मांजा ठरतोय घातक

पक्ष्यांचं जगणं मुश्किल; माणसांचेही जीव जातायेत, नायलॉन मांजा ठरतोय घातक

googlenewsNext

पुणे : सण संक्रांतीचा जवळ आला की सर्वांनाच वेध लागतात पतंगबाजीचे. यानिमित्त विविध स्पर्धादेखील पार पडतात. त्यातून मग पतंग उडवण्याच्या आनंदाबराेबरच स्पर्धा सुरू हाेते ती आपलाच पंतग अधिकाधिक उंच जावा यासाठीची. त्यासाठी आपसूकच दुसऱ्यांचा पंतग कापणेही आले. यातूनच मग बंदी असलेल्या नायलाॅन मांजाचा वापर माेठ्या प्रमाणावर हाेते आणि सण संक्रांतीचा साजरा करतानाच अनेक प्राणी, पक्ष्यांवर संक्रांत येते. हेच अनेक घटनांवरून स्पष्ट हाेते.

गेल्या काही वर्षांपासून पुण्यात पक्षी, प्राणी अडकून पडल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यात जवळपास ९० हून अधिक पक्षी हे मांजामध्ये अडकलेले असतात, अशी माहिती फायर ब्रिगेडकडून देण्यात आली आहे. नायलॉनचा मांजा वापरणे बंद केले, तरच अशा घटना टळतील.

शहरात कित्येक वर्षांपासून नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील दरवर्षी बाजारपेठेत सर्रास विक्री होताना दिसून येते. त्याविषयी जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. कारण याच नायलॉन मांजामुळे शेकडो पक्ष्यांना गळफास लागत आहे. त्यात त्यांचा निष्पाप बळी जात आहे.

झाडांवर मांजा अडकून त्यात पक्षी अडकतात. त्याची माहिती लगेच नागरिक फायर ब्रिगेडकडे देतात. गेल्या काही वर्षांमधील आकडेवारी पाहिली, तर त्यावरून गेल्या तीन वर्षांमध्ये पक्षी, प्राणी अडकल्याच्या घटनांमध्ये दुप्पट वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नायलाॅन मांजाबाबत अधिक जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मत पक्षीमित्र विशाल तोरडे यांनी ‘लोकमत’शी बाेलताना व्यक्त केले.

तीन वर्षांतील चित्र

सन २०१७ मध्ये शहरात २८४ घटनांची नोंद झाली तर २०२० मध्ये तब्बल ९४० घटना घडल्या. पुढील दोन वर्षे म्हणजे २०२१ मध्ये ७५३ आणि २०२२ मध्ये ७२२ घटनांची नोंद आहे. यावरून गेल्या तीन वर्षांमध्ये आकडा वाढला आहे.

बंदी कागदावरच 

नायलॉन मांजावर सरकारने बंदी घातली असली तरी बाजारात सर्रास विक्री सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. यावरून ही बंदी कागदावरच राहिल्याचे दिसून येते. हे प्रकार थांबवण्यासाठी मांजा विक्रेते, वापरकर्ते याबराेबरच नायलाॅन मांजा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा शोधू घेऊन त्यांच्यावर ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त हाेत आहे.

प्राणी-पक्षी अडकल्याच्या घटना

२०१६ - ३११
२०१७ - २८४
२०१८ - ४३०
२०१९ - ४३९
२०२० - ९४०
२०२१ - ७५३
२०२२- ७२२

अखेर कारवाई सुरू

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने नुकतेच खडकी येथील जुना खडकी बाजारात एका दुकानावर छापा टाकला. आदीप अब्दुल करीम तांबोळी यांच्या दुकानातून नायलॉन मांजाचे अनेक बंडल जप्त केले. २०२१ मध्येही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तांबोळी यांच्यावर कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच शहरातून आणखी एकाला बुधवारी अटक केली आहे.

दुचाकीस्वारांचा जातो जीव

दुचाकीस्वाराचे वाहन वेगात असते, तेव्हा नायलॉन मांजा समोरून आल्यावर थेट त्याच्या गळ्यावर अडकतो. अशाने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. २०२२ च्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दौंड तालुक्यातील एका ४५ वर्षीय व्यावसायिकाचा मांजामुळे गळ्यावर गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला होता. दरवर्षी एक तरी मृत्यू या मांजामुळे होत आहे. तसेच जखमी होत असल्याच्या घटनाही घडत आहेत.

Web Title: It is difficult for birds to survive Even human lives are lost nylon manja is becoming dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.