पिस्तूल, कोयत्याचे फोटो स्टेटसला ठेवणे पडले महागात! बारामतीत तिघांच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 06:14 PM2024-04-16T18:14:10+5:302024-04-16T18:15:05+5:30
आरोपींकडून अग्निशस्त्र, पुंगळ्या तसेच धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे...
बारामती (पुणे) : आचारसंहिता कालावधीत पिस्तूल आणि धारदार कोयत्याचे फोटो स्टेटसला ठेवणाऱ्या तिघांना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून अग्निशस्त्र, पुंगळ्या तसेच धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार: आकाश शेंडे, रोहित वणवे व सागर भिंगारदिवे अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. निवडणूक काळात सोशल मीडियावर बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार उपनिरीक्षक राजेश माळी यांना सावळ येथील आकाश शेंडे हा धारदार कोयता बाळगून त्याचे स्टेटस इन्स्टाग्राम अकाउंटला ठेवत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून धारदार कोयता जप्त करण्यात आला.
त्याच्या मोबाईलची बारकाईने तपासणी केल्यावर त्यात अग्निशस्त्र बाळगल्याचे फोटो मिळून आले. त्याबाबत अधिक तपास करता त्याने हे अग्निशस्त्र त्याचा साथीदार रोहित वणवे (रा. लाकडी, ता. इंदापूर) याच्याकडे असल्याचे सांगितले. पोलिसांनी लागलीच वणवे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक सिल्व्हर रंगाचे अग्निशस्त्र व खाली एक पुंगळी मिळून आली. त्याने हे हत्यार सागर भिंगारदिवे (रा. तांदूळवाडी) याच्याकडून दोन महिन्यांपूर्वी घेतल्याचे सांगण्यात आले. भिंगारदिवे याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली असता त्याने हे पिस्तूल अेांकार महाडिक याच्याकडून घेतले असल्याचे सांगितले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे, उपनिरीक्षक राजेश माळी, गणेश पाटील, दत्तात्रय लेंडवे, हवालदार राम कानगुडे, अतुल पाटसकर, बापू बनकर, अमोल नरुटे, तुषार लोंढे यांनी केली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफाॅर्मवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. व्हाॅटसॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाचे दैनंदिन माॅनेटरिंग केले जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.