स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व मान्य नाही असं म्हणणं ढाेंगीपणा; चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 07:58 PM2023-04-09T19:58:16+5:302023-04-09T19:58:41+5:30
राहुल गांधींनी स्वातंत्र्य युध्द तसेच लढणारे क्रांतीकारक आणि सावरकरांबद्दल अभ्यास केलेला नाही
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची भूमिका बाजूला ठेवली तर ते काेणालाही समजू शकणार नाहीत. तसेच त्यांची सामाजिक भूमिकाही खूप माेठी हाेती. त्यांचे हिंदुत्व मान्य नाही असं म्हणणं हा ढाेंगीपणा असल्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
गाैरव यात्रेला सुरूवात हाेताच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. मात्र, सावरकर प्रेमींनी भर पावसात महर्षि कर्वे पुतळा ते स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल या दरम्यान पायी गौरव यात्रा काढली. यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी, माजी महापाैर मुरलीधर माेहाेळ यांच्यासह सावरकर प्रेमी नागरिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. त्यांनी ‘ स्वातंत्र्यवीरांच्या सन्मानात महाराष्ट्र मैदानात’, ‘देशभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर’ या आशयाचे फलक हातात घेतले हाेते, तसेच डाेक्यावरही ‘मी सावरकर’ असे लिहिलेली टाेपी परिधान केली हाेती.
पाटील म्हणाले, राहुल गांधींनी स्वातंत्र्य युध्द तसेच लढणारे क्रांतीकारक आणि सावरकरांबद्दल अभ्यास केलेला नाही. आणि ते स्वातंत्र्यवीरांचा अपमान, हीन वक्तव्य करीत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांविराेधात रस्त्यावर उतरून उत्तर देण्याची गरज हाेती. यांना शक्तीचीच भाषा समजते, राष्ट्रवादीसह उध्दवजींचीही भाषा बदलली आणि आता सगळे गुणगान गायला लागले आहेत. तुमचे सावरकरांबद्दलचे प्रेम हे राजकीय आहे का? असा सवालही उपस्थित केला.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, देशप्रेमींचा अपमान ही काॅंग्रेसची निती आहे, सावकरांचा अपमान हिंदुस्थान कदापि सहन करणार नाही.
माेहाेळ म्हणाले, किती वेळा सावरकरांचा अपमान करणार ? या विराेधात देशभरात तीव्र असंताेष आहे. या गाैरव यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांच्या मनात त्याबद्दल चीड असून ते निषेध नाेंदवित आहेत.
भारतरत्नाचा याेग्य वेळी निर्णय
सावरकरांना भारतरत्न दिला जाईल, प्रत्येक गाेष्टीची एक प्रक्रिया असते, त्यांच्यासह आणखी काही जणांना पुरस्कार द्यायचा आहे. पुरस्काराबाबत याेग्य वेळेला निर्णय घेण्यात येईल. त्याबाबत तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नसल्याचे पाटील म्हणाले.