"साहेबांबद्दल चुकीचा शब्द जाणे अशक्य..." शरद पवारांवरील टीकेनंतर वळसे पाटलांचा 'यु टर्न'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 01:43 PM2023-08-21T13:43:03+5:302023-08-21T13:43:51+5:30
मेळाव्यात वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर वाद झाला होता...
मंचर (पुणे :शरद पवार यांच्याबद्दल माझ्याकडून कोणताही चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीही कोणाचा गैरसमज झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे स्पष्टीकरण सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरद पवार सभागृहात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर वाद झाला होता.
शरद पवार यांच्या उंचीचा राज्यात एकही नेता नाही असं आपण म्हणतो. परंतु पवार यांच्या एकट्याच्या ताकदीवर राज्यातील जनतेने एकदाही एकहाती सत्ता दिली नाही. उत्तुंग नेता असतानाही आपण ठराविक आमदारच निवडून आणू शकलो. कुणाशी तरी आघाडी करावी लागते. इतर राज्यांमध्ये अनेक स्थानिक पक्षांनी त्या राज्यात सत्ता मिळवली, अशी टीका सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी रविवारी केली होती.
आधी टीका नंतर दिलगिरी-
याबाबत वादंग निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र या संदर्भात खुद्द दिलीप वळसे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली असून शरद पवार यांच्याबद्दल माझ्याकडून कोणताही चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीही मी याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, अशी सष्टोक्ती दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
शरद पवारांना भेटून वस्तुस्थिती सांगणार-
वळसे पाटील म्हणाले, शरद पवार यांच्यावर मी टीका केलेली नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी केलेली कामगिरी मोठी आहे. त्या तुलनेत राज्यातील जनता ज्या खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभी राहिला हवी होती जो पाठिंबा मिळायला हवा होता तो मिळालेला नाही, अशी खंत मी बोलून दाखवली. शरद पवार यांच्याबद्दल मी आदरच व्यक्त केला आहे व यापुढे करत राहणार आहे. त्यांच्यामुळेच मी सलग ३२ वर्षे आमदार झालो असून अनेकदा मंत्रीपदे मिळाली आहेत.
खंत व्यक्त केली होती-
राज्यातील जनतेने पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे अशी खंत मी बोलून दाखवली. यापूर्वी ही भूमिका मी पक्षाच्या व्यासपीठावर मांडली आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घेतला गेला नाही. ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी शरद पवार यांना भेटून वस्तुस्थिती सांगणार आहे,असे सांगून आंबेगाव तालुक्यात शरद पवार आले तर त्यांचे पूर्वीप्रमाणेच कार्यकर्ते जंगी स्वागत करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.