विनोदावर रागवण्यापेक्षा अंतर्मुख होणे जास्त महत्त्वाचे; सतीश आळेकरांनी टोचले राजकारण्यांचे कान
By नम्रता फडणीस | Updated: March 27, 2025 19:32 IST2025-03-27T19:32:34+5:302025-03-27T19:32:49+5:30
कलाकारांनी देखील करमणूक म्हणजे केवळ विनोद आहे की त्यातून काही सर्जनशील साधायचे आहे याचा विचार करावा

विनोदावर रागवण्यापेक्षा अंतर्मुख होणे जास्त महत्त्वाचे; सतीश आळेकरांनी टोचले राजकारण्यांचे कान
पुणे: महाराष्ट्राला विनोदाची आणि विडंबनाची मोठी परंपरा आहे. गाढवाचं लग्न आणि इच्छा माझी पुरी करा अशा कार्यक्रमांमध्ये तत्कालीन पुढारी समोर बसलेले असताना त्यांच्यावर राजकीय कोटी करण्यात येत असे. कलाकारांवर न रागवता ते नितळ हास्यातून त्याला दाद देत. विनोदावर रागवण्यापेक्षा अंतर्मुख होणे जास्त महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात ही सहनशीलता, सहिष्णुता कोठे आहे? असा सवाल उपस्थित करीत, याचा राजकारण्यांनी विचार करावा अशा शब्दांत ज्येष्ठ नाटककार, पटकथाकार आणि दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांनी नेत्यांचे कान टोचले.
रमणबाग प्रशालेत जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सदानंद आचवल स्मृत्यर्थ पुरस्कार वितरण आणि आजी-माजी विद्यार्थी कलाकारांच्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. सध्याच्या एका विडंबनात्मक गाण्यामुळे राजकीय क्षेत्रात उठलेल्या वादळाचा संदर्भ घेत, कलाकारांनी देखील करमणूक म्हणजे केवळ विनोद आहे की त्यातून काही सर्जनशील साधायचे आहे याचा विचार करावा. असा सल्ला आळेकर यांनी दिला. नाटक हा समाजाचा आरसा असतो. समाजात घडणाऱ्या विविध घटना आणि प्रवृत्ती यांचे प्रतिबिंब नाटकात उलटे सुलटे किंवा तिरके अशा कोणत्यातरी स्वरूपात निश्चितपणे दिसून येत असते. कलाकाराने आपल्या कलाकृतीतून नेमके काय मांडायचे, हे विचार करून ठरवायचे असते, असेही ते म्हणाले.