प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाचे दर्शन घ्यायला जाणे योग्य नव्हे; रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 07:19 PM2023-06-29T19:19:41+5:302023-06-29T19:19:53+5:30

प्रकाश आंबेडकरांनी दर्शन घ्यायचेच असेल, तर चैत्यभूमीत जाऊन बाबासाहेबांचे व रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यावे

It is not right for Prakash Ambedkar to visit Aurangzeb; Ramdas Athawale's reaction | प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाचे दर्शन घ्यायला जाणे योग्य नव्हे; रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाचे दर्शन घ्यायला जाणे योग्य नव्हे; रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

googlenewsNext

पुणे : प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाचे दर्शन घ्यायला जाणे योग्य नव्हते. दर्शन घ्यायचेच असेल, तर चैत्यभूमीत जाऊन बाबासाहेबांचे व रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यावे असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले पुण्यातील पत्रकार परिषदेत दिला आहे. 

आठवले म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत ३२५ पेक्षा अधिक जागा आम्हाला मिळतील. विरोधक जितके एकत्र येतील त्याप्रमाणात जनतेपर्यंत मोदी पोहोचतील. वेगवेगळ्या क्षेत्रात भारताने आघाडी घेतलेली असून रोजगार निर्मितीस प्राधान्य देण्यात आले आहे. दहा लाख लोकांना एका वर्षात सरकारी नोकरी देण्याचे काम केले जात आहे. खासगी उद्योगांना प्रोत्साहन दिले जात असून लोकांनी त्याचा फायदा घ्यावा. राज्यात उद्योग वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. विरोधकांनी केवळ विरोध न करता सरकारला सहकार्य करणे ही खरी लोकशाही आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार चांगले चालले असून, वर्षपूर्तीच्या त्यांना शुभेच्छा देतो. या सरकारला कोणताही धोका नाही. शिंदे-फडणवीस आपला कार्यकाळ पूर्ण करतील आणि पुढील पाच वर्षे त्यांचीच सत्ता येईल असा विश्वासही यावेळी व्यक्त केला आहे.  

मराठा आरक्षणाला विरोध नाही..

मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, आमच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण त्यांना द्यावे, असे आमचे म्हणणे आहे. भटक्या विमुक्त, ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्याबाबत अभ्यास सुरु आहे. त्याचा फायदा सर्व समाजाला होईल. जातीनिहाय जनगणना झाली, तर सर्वांना कोणत्या जातीचे किती प्रमाण आहे, ते समजेल. याबाबत सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे.

गुलाबी रंग चालणार नाही..

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांचा गुलाबी रंग महाराष्ट्रात चालणार नाही. नाराज नेत्यांना घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. छगन भुजबळ यांची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारी नाही. भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांचे आमच्या पक्षात स्वागतच आहे. पंकजा मुंडे यांना पक्षात येण्याचे आमंत्रण देणार नाही, मात्र मिटवून घेण्याचा सल्ला देईन.

Web Title: It is not right for Prakash Ambedkar to visit Aurangzeb; Ramdas Athawale's reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.