साहेब होण्यासाठी अशी शाळा करणे बरोबर नाही;पदोन्नती मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जोडली बोगस प्रमाणपत्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 01:38 PM2024-12-04T13:38:33+5:302024-12-04T13:40:47+5:30
राज्यात एवढ्या शिक्षण संस्था अधिकारी शिकण्यासाठी परराज्यांत का गेले? असा उपरोधिक सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
पिंपरी : विधानसभा निवडणुकीचा फिव्हर कमी झाला आहे. परंतु पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे बोगस प्रमाणपत्र आणि त्याचा आधार घेऊन घेतलेली पदोन्नती. खरं म्हणजे राज्यात एवढ्या शिक्षण संस्था अधिकारी शिकण्यासाठी परराज्यांत का गेले? असा उपरोधिक सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. साहेब होण्यासाठी अशी ‘शाळा’ करणे बरोबर नाही, असा टोलाही लगावला जात आहे.
परराज्यांतील विद्यापीठांच्या पदव्यांच्या आधारे पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पदावर पदोन्नती मिळविल्या आहेत. दूरस्थ शिक्षणाद्वारे नियमबाह्य पद्धतीने बोगस अभियंता पदविका प्रमाणपत्र सादर करून काही जण महापालिकेत पदोन्नतीने अभियंता पदावर कार्यरत आहेत. तर आणखी काही जण याच पद्धतीने बोगस प्रमाणपत्र देऊन पुन्हा महापालिका प्रशासनाची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे बोगस पदव्या घेऊन महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी पदोन्नती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्या अधिकारी-कर्मचाऱ्यावर महापालिकेकडून कोणतीही कारवाई केलेली नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीनुसार वर्ग तीन व चारमधील पात्र कर्मचाऱ्यांना कनिष्ठ अभियंतापदावर पदोन्नती देण्याची तरतूद आहे. या नियमाच्या आधारे गेल्या दहा वर्षांत महापालिकेत रखवालदार, मजूर, गवंडी, बिगारी, शिपाई, क्लार्क, आरोग्य निरीक्षक, सर्व्हेअर अशा कर्मचाऱ्यांना कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक होण्याची संधी मिळाली आहे. मात्र, ही पदोन्नती मिळविताना अनेक कर्मचाऱ्यांनी परराज्यांतील म्हणजेच राजस्थान, केरळ, कर्नाटक, आसाम, सिक्कीम या राज्यांतील विद्यापीठांच्या पदव्या घेतल्या आहेत.
राज्याबाहेरील पदव्यांना महापालिकेत पदोन्नतीसाठी बंदी
राज्याबाहेरील विद्यापीठामार्फत दूरस्थ तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून धारण केलेली पदवी/पदविका विधी ग्राह्य आहे की नाही? याबाबत शासनाच्या विविध प्राधिकरणामार्फत आलेले आदेश आणि सूचना यांचा एकत्रित अभ्यासानुसार राज्याबाहेरील मान्यता नसलेल्या विद्यापीठ व शैक्षणिक संस्थेची पदवी किंवा पदविका ग्राह्य धरली जाणार नाही, असे लेखी आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी काढले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने याबाबत आता स्पष्ट भूमिका घेऊन परराज्यातील पदव्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यांना राज्याबाहेरील विद्यापीठाकडून दूरस्थ तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून धारण केलेल्या पदवी, पदविका ग्राह्य धरली जाणार नाही, असा स्पष्ट आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी काढला आहे. त्यामुळे सामान्य प्रशासनाकडून राज्याबाहेरील कर्मचाऱ्यांच्या पदवी, पदविका ग्राह्य धरून आदेश काढल्यानंतर एकाही कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिलेली नाही. मात्र, पूर्वी दिलेल्या पदोन्नतीबाबत मला काहीच माहिती नाही.
-विठ्ठल जोशी, उपायुक्त, महापालिका