अण्णा हजारे यांना लोकं दुसरे गांधी म्हणतात हे हास्यास्पद - जितेंद्र आव्हाड
By विवेक भुसे | Published: December 14, 2023 11:51 AM2023-12-14T11:51:51+5:302023-12-14T11:53:03+5:30
जितेंद्र आव्हाड यांचे हे उत्तर म्हणजे अण्णा हजारे यांचा अपमान व बदनामी करणारे असुन अण्णांशी बोलून पुढील निर्णय घेणार
पुणे: समाजसेवक अण्णा हजारे यांना लोक दुसरे महात्मा गांधी म्हणतात, हे हास्यास्पद असून त्यांनी माहिती अधिकार कायदा आणण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी काही प्रयत्न केल्याचे कुठल्याही प्रकारचे पुरावे उपलब्ध नाही. तसेच अण्णा हजारे यांच्या मुळे जनलोकपाल, लोकायुक्त कायदा अंमलात आला हे देखील सपशेल खोटं आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कळविले आहे.
या माणसामुळे म्हणजेच अण्णा हजारे यांच्या मुळे देशाचं वाटोळं झालं, गांधी टोपी घातली म्हणून कोणी गांधी होत नाही, असे बदनामीकारक वक्तव्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा फोटो प्रसिद्ध करून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते. अण्णा हजारे यांची बदनामी केली म्हणून अण्णांचे वकील अॅड. मिलिंद द. पवार यांनी अण्णा हजारे यांच्या वतीने अण्णांची बदनामी केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. अॅड. पवार यांच्या कायदेशीर नोटिशीला जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वकीलांमार्फत उत्तर दिले आहे.
जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या उत्तरातून म्हणतात की, अण्णा हजारे हे दुसरे गांधी आहेत असं लोकं म्हणतात, हे हास्यास्पद आहे. तसेच माहिती अधिकार कायद्याच्या अंमल बजावणीसाठी किंवा कायदा आणण्यासाठी अण्णा हजारे यांनी काही प्रयत्न केल्याचे कुठल्याही प्रकारचे पुरावे उपलब्ध नाहीत. तसेच जनलोकपाल, लोकायुक्त कायदा अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे आला हे खोटे असुन, जनलोकपालसाठी अनेक आंदोलनं झाले. त्यामध्ये अनेक लोकं होते. त्यापैकी अण्णा हजारे हे एक व्यक्ती म्हणून हजर होते. अण्णा हजारे स्वत: ची प्रतिष्ठा व प्रतिमा उंचावण्यासाठी स्वत:ला दुसरे गांधी म्हणवून घेत आहेत. अण्णा हजारे यांच्यामुळे माहिती अधिकार कायदा अंमलात आला, अण्णा हजारे यांच्या मुळे जनलोकपाल, लोकायुक्त कायदा अंमलात आला हे देखील सपशेल खोटं आहे. त्यामुळे मी काही कोणाची बदनामी केलेली नाही. या माणसामुळे देशाचं वाटोळं झालं हे वाक्य माझे वैयक्तिक मत होते. अण्णा हजारे यांनी अॅड़ मिलिंद पवार यांच्या वतीने पाठवलेली कायदेशीर नोटीस तुम्ही परत घ्यावी. मला तुमच्या नोटीसला कारण नसताना उत्तर देणं तुम्ही भाग पाडले म्हणून तुम्हीच मला १ लाख रुपये द्यावेत. माझ्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई करू नये. असे उत्तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अॅड़ मिलिंद पवार यांना व अण्णा हजारे यांना पोस्टाने पाठविले आहे. जितेंद्र आव्हाड यांचे हे उत्तर म्हणजे अण्णा हजारे यांचा अपमान व बदनामी करणारे असुन अण्णांशी बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचे अण्णांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी सांगितले.