मोदींनी बोलायला सुरुवात केली कि, 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' सुरू झाली असं म्हणतात - रवींद्र धंगेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 12:11 PM2024-04-29T12:11:17+5:302024-04-29T12:11:33+5:30

खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारची जुमलेबाजी आता जनतेला चांगलीच समजली

It is said that when narendra modi started talking the bullet train of comedy started - Ravindra Dhangekar | मोदींनी बोलायला सुरुवात केली कि, 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' सुरू झाली असं म्हणतात - रवींद्र धंगेकर

मोदींनी बोलायला सुरुवात केली कि, 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' सुरू झाली असं म्हणतात - रवींद्र धंगेकर

किरण शिंदे 

पुणे : वर्षाला २ कोटी रोजगार देवू... १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर देवू... सर्व टोल नाके बंद करू... पेट्रोल, गॅस स्वस्त करू... अशी खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारची जुमलेबाजी आता जनतेला चांगलीच समजली आहे. सभेत 'त्यांनी' बोलायला सुरवात केली की घरातली लहान-मोठी माणसे 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' सुरू झाली, असे म्हणत आहेत. 'त्यांची' नौटंकी आता चालणार नाही, अशी खरमरीत टीका पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज येथे केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. ही सभा म्हणजे पुणेकरांसाठी कॉमेडीची बुलेट ट्रेन आहे. त्यांनी सातत्याने नागरिकांना खोटी आश्वासने दिली. त्यामुळे मनोरंजन म्हणूनच नागरिक आता 'त्यांच्या' सभेकडे पाहतात, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, महागाई का कमी केली नाही, यावर ते बोलणार नाहीत. बेरोजगारी का वाढतेय, याकडे ते दुर्लक्ष करणार. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबल्या नाहीत, असे विचारल्यानंतर ते कानावर हात ठेवतात. महिलांवर अत्याचार का वाढले आहेत, असे म्हणल्यानंतर ते डोळे बंद करतात. असे हे अंधे-मुके आणि बहिरे सरकार आपण गेल्या दहा वर्षांत पाहिले आहे.

केंद्र सरकारने पन्नास रुपयांचे पेट्रोल ११० रुपयांवर नेले. ४०० रुपयांचा गॅस १२०० रुपयांवर नेला. त्यामुळे सर्वसामान्यांना काय हाल सोसावे लागत आहेत, हे मोदींनी कधी रस्त्यावर उतरून पाहिले नाही. सभा घेणे, भाषणे ठोकणे म्हणजे लोकांमध्ये मिसळणे, असे होत नाही. गेल्या १० वर्षात ते एकदाही लोकांमध्ये मिसळले नाहीत. इतकेच काय या १० वर्षात एकही पत्रकार परिषद त्यांनी घेतली नाही. अनेक चॅनेल त्यांनी विकत घेतले असले तरी पत्रकारांच्या प्रश्नांना ते घाबरतात, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, नोटबंदी आणि जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू केल्यामुळे हजारो छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेकांना आपले व्यवसाय बंद करावे लागले. तर अनेकांनी आत्महत्या केल्या. आपल्या देशात कोरोना येण्याआधीच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला 'जनतेची काळजी घ्या, कोरोना जगात सर्वत्र पसरत आहे', असे पत्राद्वारे कळवले होते. पण, केंद्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, देशातील लाखो लोक मृत्युमुखी पडले. या दहा वर्षांत केवळ धार्मिक तेढ वाढवण्याचे काम या सरकारने केलेले आहे. आता यांना जनताच योग्य ती जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

Web Title: It is said that when narendra modi started talking the bullet train of comedy started - Ravindra Dhangekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.