Pune Navratri: आदिशक्तीच्या दारी भाविकांची बारी! नवरात्र महोत्सवाला प्रारंभ, देवीच्या मंदिरांमध्ये गर्दी
By श्रीकिशन काळे | Published: October 15, 2023 04:15 PM2023-10-15T16:15:56+5:302023-10-15T16:16:49+5:30
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सर्व देवीच्या मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे
पुणे : शहरातील देवीच्या मंदिरांमध्ये रविवारी (दि.१५) नवरात्र महोत्सवाला सुरवात झाली. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनांसाठी गर्दी केली होती. तांबडी जोगेश्वरी मंदिर, तळजाई माता मंदिर, चतृ:श्रृंगी मंदिर, भवानी माता मंदिर, श्री महालक्ष्मी माता मंदिरांमध्ये मंगलमय वातावरणात महोत्सवाला प्रारंभ झाला. नऊ दिवसांमध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सर्व देवीच्या मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ठिकठिकाणी दर्शन बारीसाठी खास सोय केली आहे. अनेक मंदिरांनी भाविकांचा विमा काढला आहे. तर बऱ्याच मंदिरांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या नवरात्रामध्ये भोंडला, गरबा आदी कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.
ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिरामध्ये सकाळी सहा वाजता घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले केले. भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दिवसभरही पुणेकरांनी त्या ठिकाणी जाऊन देवीचे दर्शन घेतले. दररोज देवी विविध रूपांमध्ये आणि वेगवेगळ्या वाहनांवर आरूढ झालेली पहावयास मिळणार आहे. शुक्रवार पेठेतील पिवळी जोगेश्वरी मंदिरात सकाळी ९ वाजता विधीवत पध्दतीने घटस्थापना झाली. श्री काळी जोगेश्वरी मंदिरात सकाळी ८ वाजता घटस्थापना झाली. तळजाईमाता देवस्थान येथे सकाळी दहा वाजता विजय थोरात यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. कर्वेनगरमधील वनदेवीची घटस्थापना दुपारी साडे बारा वाजता झाली.
श्री चतृ:शृंगी मंदिर देवस्थान येथे सकाळी साडेनऊ वाजता घटस्थापना झाली. मंदिराचे विश्वस्त डॉ. गंगाधर अनगळ यांच्या हस्ते अभिषेक, रूद्राभिषेक, महापूजा करण्यात आली. यंदा देवीसाठी चांदीची नवी आयुधे तयार केली आहेत. भवानी पेठेतील श्री भवानीदेवी मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ६ वाजता महारूद्रभिषेक महापूजा करण्यात आली. नऊ दिवस सहस्त्रनाम पठण आणि श्रीसुक्त पठण होणार आहे. रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेत मंदिर बंद राहणार आहे, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त विनायक मेढेकर यांनी दिली आहे.
मेट्रो, चंद्रयानमधील महिलांचा सन्मान
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा प्रारंभ घटस्थापनेने झाला. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक सजावट केली आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजता चितळे उद्योगसमूहाचे गोविंद चितळे व कुटुंबियांच्या हस्ते घटस्थापना झाली. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमांसोबतच पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रथमच महिला मेट्रो चालक व पदाधिका-यांचा सन्मान सोहळा तसेच भारताच्या चंद्रयान यशस्वी मोहिमेबद्दल महिला शास्त्रज्ञांचा सन्मान सोहळा आयोजिला आहे. तसेच दहा दिवसात श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत.