'या' लावणी नृत्यांगणा नव्हे तर चक्क पुरुष कलावंत; खेड तालुक्यात करतायेत लावणी सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 07:29 PM2023-04-24T19:29:35+5:302023-04-24T19:30:19+5:30
समाज नावे ठेवतो पण आम्ही कला हेच जीवन मानून रसिकांची सेवा करतो
चंद्रकांत मांडेकर
चाकण : पुरुषाने थोडेसे बायकी हावभाव केले की त्याची लगेच चेष्टा केली जाते. पुरुष कलाकार जेव्हा स्त्री पात्र साकारण्यासाठी स्टेजवर येतात, तेव्हा नेहमी हास्याचा विषय बनतात. पुरुषांना स्त्री पात्र रंगवताना अनेक बरे-वाईट अनुभव येतात. तरी देखील पुरुषांमध्ये याची क्रेझ वाढत आहे. सध्या पुरुष कलावंत खूप सुंदर लावणी सादर करताना आढळून येत आहेत.
पूर्वीमध्ये जुन्या यात्रा जत्रांत महिलांना काही बंधने होती. काही ठिकाणी अशा कार्यक्रमात महिलांना काम करण्याची परवानगी नव्हती आणि काही ठिकाणी अशा प्रथा अजूनही कायम आहेत. लोकांना अजूनही असेच वाटते की, लावणी ही महिलांनीच सादर केली पाहिजे. त्यामुळे बरेच लोक पुरुष कलावंतांना कार्यक्रमांना बोलवत नाहीत. अशावेळी जिथे कुठे नृत्याचे कार्यक्रम किंवा स्पर्धा आयोजित केल्या जातात. अशा ठिकाणी आवर्जून ही पुरुष मंडळी लावणी सादर करायला जातात. यातील काहींनी तर बक्षिसेही मिळविली आहेत. बऱ्याच कार्यक्रमांत प्रेक्षकांना माहीतच नसते की, लावणी सादर करणारे महिला आहेत की पुरुष इतके अप्रतिम लावणी नृत्य सादर करतात.
चांगले वाईट अनुभव
लावणी सादर करताना चांगले - वाईट अनुभव येतात. एखादा पुरुष डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत महिलांच्या वेशभूषेत असल्यानंतर काही लोक वेगळ्या नजरेने पाहतात; पण त्याकडे लक्ष दिले जात नाही.
कला हेच जीवन
गेली सतरा वर्षांपासून स्त्री पात्र साकारत आहे. मला लहानपणापासून आवड होती. लहानपणी गावी भारुडे असायची. त्यामध्ये पुरुषच स्त्री पात्र करतात. मग, मीदेखील करू लागलो. मी नृत्य आणि वगनाट्य यातून स्त्रीपात्र रेखाटतो. वेडी झाले पतीसाठी, नाती तुटली पैशांसाठी, सख्खा भाऊ पक्का वैरी, अशा काही नाटकांत स्त्री पात्र करतो. समाज नावे ठेवतो, पण कला हेच जीवन आहे. रसिकांची सेवा आहे. - उमेश मुळशीकर,नृत्य कलावंत.
स्त्री पात्राला खूप सारी बक्षिसे
मला शाळेपासून अभिनयाची व नृत्याची आवड होती. काही दिवसांनी स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागलो; पण त्यामध्ये श्री कलाकारांना जास्त बक्षिसे मिळायची, मग मला माझ्या आईने श्री पात्र करायला लावले आणि मी ते सादर करू लागलो. - डेनिस राऊत,नृत्य कलाकार.
प्रेक्षकांची दाद महत्त्वाची
मी पुरुष असून स्त्री पात्र करताना जो आनंद मिळतो, तो कुठेच मिळू शकत नाही. जेव्हा मी स्त्री पात्र साकारतो तेव्हा मला फार वेगळे वाटते. प्रेक्षकांची दाद महत्त्वाची असते. पुरुषांनी स्त्री पात्र करणे फार कठीण आहे. - संगम गोवर्धन, कलाकार.