अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने वाटचाल भारतासाठी अतिशय गरजेचे; राजनाथ सिंह यांची माहिती
By नितीश गोवंडे | Published: May 15, 2023 05:28 PM2023-05-15T17:28:32+5:302023-05-15T17:29:20+5:30
आपल्या प्रतिस्पर्ध्यांकडे अधिक जास्त आधुनिक तंत्रज्ञान असेल तर भविष्यात ही बाब आपल्यासाठी चिंताजनक ठरेल
पुणे : सायबर आणि अंतराळाशी संबंधित नव्याने उदयाला येणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी भारताला पूर्णपणे सक्षम बनवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने वाटचाल करण्याचा आणि प्रगती साध्य करण्याचा सल्ला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संशोधन संस्थांना दिला आहे. ते सोमवारी पुण्यामध्ये डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा या संस्थेच्या १२ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. सध्याच्या जागतिक परिस्थितीत विविध देशांमध्ये सातत्याने बदलत राहणाऱ्या राजकीय आणि आर्थिक समीकरणांची राजनाथ सिंह यांनी यावेळी माहिती दिली.
विज्ञान आणि तंत्रज्ञान, युद्धाचे डावपेच अतिशय वेगाने निर्माण होत आहेत आणि त्यामुळे सध्या जगाला अनुभव येत असलेल्या नॉन-कायनेटिक आणि संपर्करहित युद्धांना तोंड देण्यासाठी पारंपरिक पद्धतींबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात अतिशय वेगाने प्रगती होणे गरजेचे आहे असे संरक्षणमंत्री म्हणाले.
आपल्या प्रतिस्पर्ध्यांकडे अधिक जास्त आधुनिक तंत्रज्ञान असेल तर भविष्यात ही बाब आपल्यासाठी चिंताजनक ठरेल. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानविषयक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करणे ही आपल्यासाठी अतिशय तातडीची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. ही जबाबदारी आपल्या संस्थांची आहे, असे ते म्हणाले. संरक्षण क्षेत्र म्हणजे एका जागी स्थिर असलेला तलाव नसून एक वाहती नदी आहे. ज्या प्रकारे एखादी नदी आपल्या वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना ओलांडत पुढे जात राहते त्या प्रकारे आपल्याला सुद्धा सर्व अडथळे पार करून पुढे गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
संरक्षण संशोधन आणि अतिशय अचूकता असलेले तंत्रज्ञान यांच्यातील जवळचा संबंध अधोरेखित करत राजनाथ सिंह यांनी डीआयएटी सारख्या संस्थांना केवळ संरक्षण क्षेत्रासाठीच नव्हे, तर सामान्य नागरिकांना देखील तितक्याच प्रमाणात फायदेशीर असलेले नवीन नवोन्मेषी संशोधन हाती घेण्याचे आवाहन केले. संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनाबाबत सविस्तर माहिती देताना संरक्षणमंत्र्यानी ही संकल्पना म्हणजे सर्वात महत्त्वाचा घटक असून देशातील संरक्षण सामग्रीला बळकटी देण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे असे सांगितले.
संरक्षण उपकरणांच्या आयातीवरील अवलंबित्व भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेमध्ये अडथळा ठरू शकते यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला. या मुख्य कारणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार या क्षेत्रात आत्मनिर्भरत बनण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.
सरकारच्या प्रयत्नांमुळे दिसून येत असलेल्या परिणामांवर, संरक्षण मंत्री म्हणाले की आज भारत रायफल, ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, हलकी लढाऊ विमाने आणि स्वदेशी विमानवाहू वाहक तयार करत आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी सरकारच्या विविध प्रयत्नामुळे मूर्त रुपात दिसत असलेल्या परिणामाबद्दल बोलताना सांगितले. संरक्षण निर्यातीत अलिकडच्या वर्षांत अनेक पटींनी वाढ झाली आहे. या निर्यातीत २०१४ मधील ९०० कोटी रुपयांवरून २०२२-२३ च्या आर्थिक वर्षात १६,००० कोटी रुपयांपर्यंत वृद्धी झाली आहे. भारत अनेक देशांना संरक्षण उपकरणे निर्यात करत आहे.अनेक देशांनी भारताच्या उत्पादन क्षमतेमध्ये स्वारस्य आणि विश्वास दाखवला आहे, असे ते म्हणाले. २०४७ पर्यंत मजबूत, समृद्ध, आत्मनिर्भर आणि विकसित भारताचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्यासाठी देशाच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले.