‘ते’ गेले चांगलेच झाले, मोकळ्या जागेवर आम्ही लढू अन् जिंकूही; शिवसैनिकांच्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 11:17 AM2022-07-22T11:17:35+5:302022-07-22T11:36:12+5:30
जिल्ह्यातील प्रस्थापितांनी शिंदेसेना जवळ केल्याने शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेते जागा मोकळी झाल्याची भावना
पुणे : जिल्ह्यातील प्रस्थापितांनी शिंदेसेना जवळ केल्याने शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेते जागा मोकळी झाल्याची भावना व्यक्त करत आहेत. ते होते तेव्हा त्यांनी काहीच केले नाही आणि आम्हाला कधी पुढेही येऊ दिले नाही, आता जागा तर मोकळी झालीच आहे, पण ती आम्ही लढू व जिंकूनही दाखवू, अशी भावना दुसऱ्या फळीतील नेत्यांची व्यक्त केली.
शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव शिवसेनेकडून तीन वेळा खासदार होते. यावेळी त्यांचा पराभव झाला. या मतदारसंघातील बहुतेक तालुक्यात शिवसेनेचे चांगले संघटन आहे. आढळराव यांची तिथे पकडही होती. मात्र त्यामुळेच दुसऱ्या फळीतील तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांना संधीच मिळत नव्हती. माजी आमदार महादेव बाबर, ॲड. अविनाश राहणे, राम गावडे, माजी नगरसेविका सुलभा ऊबाळे अशी अनेक नावे या मतदारसंघात आहेत. त्यांचेही त्यांच्या तालुक्यात चांगले संघटन आहे. मात्र इच्छा असूनही त्यांना पुढची राजकीय उडी घेता येत नव्हती. ती आता घेता येईल अशीच त्यांची भावना आहे.
पुरंदर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बंडखोरी केली आहे. ते दोन वेळा आमदार, त्यातील दुसऱ्या वेळी राज्यमंत्री झाले. आताच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून ते शिवसेनेतून बाजूलाच होते, त्यामुळे त्यांच्यावर स्थानिक शिवसैनिकांची नाराजी होतीच. तिथेही दुसऱ्या फळीतील अनेकांना आता आपल्याला संधी मिळाली असेच वाटत आहे. त्यातूनच तब्बल ४०० शिवसैनिकांनी चार गाड्या करून थेट मुंबईत मातोश्री गाठली व विधानसभा पुन्हा शिवसेनेकडे घेऊ, असे जाहीरपणे सांगितले.
शहरात अजूनही नाही धक्का
पुणे शहरात शिवसेनेच्या संघटनेला फारसा धक्का लागलेला नाही, मात्र माजी शहरप्रमुख अजय भोसले, युवासेनेचे प्रदेश सहसचिव किरण साळी व प्रामुख्याने माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी शिंदेसेना जवळ केली आहे. नाना भानगिरे यांनी अजून काही माजी नगरसेवक संपर्कात असल्याचे जाहीर केले असले तरी सध्या तरी तशा हालचाली दिसत नाहीत, मात्र खुद्द भानगिरे यांच्यात प्रभागात त्यांना विरोध करणारे शिवसेनेत बरेच जण होते. संधी मिळणार असल्याने त्यांच्यातील अनेकांना शिवसेनेकडून महापालिका लढवण्याची तयारीही सुरू केली आहे.