हा मला जगायचं आणि मी माझ्याच पद्धतीने जगणार... : तनुजा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 02:38 PM2019-09-25T14:38:09+5:302019-09-25T14:45:59+5:30
आप मुझे अच्छे लगने लगे, ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, ओ मेरे दिलके चैन..यांसारख्या गाण्यांमधली तनुजा यांची लोभस छबी रसिकांना सुखावून गेली...
पुणे : माझ्यासाठी 'पंचाहत्तर' हा फक्त एक नंबर आहे. जीवन नंबरात मोजत गेलो तर जगण्याला अर्थच उरणार नाही. मला जगायचंय आणि मी माझ्याच पद्धतीने जगणारं.आहे. आज मेरा पहिला बर्थडे है....अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी आपल्या बोल्ड विचारांचे दर्शन घडविले.
रसिकांमध्ये चित्रपट कलेविषयी जाण वाढावी आणि अभिजात प्रेक्षक घडावेत या हेतूने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया ( वेस्टर्न रिजन) च्या वतीने आयोजित चौदाव्या रसास्वाद शिबिराच्या समारोपानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. आई शोभना समर्थ यांच्याकडून अभिनयाचा वारसा लाभलेल्या तनुजा यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. आपल्या स्वतंत्र आणि परखड विचारसरणीसाठी प्रसिद्ध असलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्रीचा वाढदिवस पुण्यात साजरा करण्यात आला. त्यांच्या बालपणापासून चित्रपटापर्यंतचा अनोखा पट पडद्यावर उलगडण्यात आला..योगी चौबळ यांनी त्यांच्यावर चित्रित केलेली छोटी फिल्म दाखविण्यात आली. आप मुझे अच्छे लगने लगे, ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, रात अकेली है बुझ गये दिये, ओ मेरे दिलके चैन, सून जा ऐ थंडी हवा...अशा गाण्यांमधली तनुजा यांची लोभस छबी रसिकांना सुखावून गेली...यावेळी तनुजा यांची कन्या तनिशा, दिग्दर्शक व अभिनेते नितीश भारद्वाज तसेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आणि समन्वयक सतीश जकातदार उपस्थित होते.
तनुजा यांनी आपल्या संग्रहातील कौटुंबिक आणि छबिली चित्रपटातील दुर्मीळ छायाचित्रे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्त केली. तर संग्रहालयातर्फे चांद और सूरज मधील त्यांचे छायाचित्र तनुजाला भेट म्हणून देण्यात आले.यावेळी शिबिरातील काही निवडक प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.
नमस्कार सर्वांना, मला मराठीत एवढंच बोलता येते. तुमच्या प्रेमाने मी खूप भारावून गेले आहे. तुम्ही मला घडवले आहे. जे कलाकार काम करतात ते तुमचं मनोरंजन पण करतात पण काहीतरी शिकवण देखील देतात, ती तुम्ही लक्षात ठेवाल.. एवढी अपेक्षा आहे, असे सांगून तनुजा म्हणाल्या, कोणताही चित्रपट चांगला किंवा वाईट असे मत मी कधी व्यक्त करीत नाही. चित्रपट दृष्टीकोन तयार करूनच बनवला जातो. त्यामुळे भारतीय चित्रपट शंभर वर्षांचा झाला तो चांगला किंवा वाईट मला काही म्हणायचं नाही असे सांगून त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.
सुप्रिया चित्राव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.तनुजा यांच्या 75 व्या वाढ्दिवसानिमित्त नितीश भारद्वाज लिखित ' पितृॠण ' हा चित्रपट दाखविण्यात आला.